अमिताभ बच्चन यांचा जावई अडचणीत, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

अमिताभ बच्चन यांचा जावई अडचणीत, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : अमिताभ बच्चन म्हणजे बॉलीवूड मधील मोठं प्रस्थ. याच अमिताभ बच्चन यांचे जावई आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अमिताभ यांचे जावई निखिल नंदा आणि ट्रॅक्टर कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील दातागंज पोलिसांनी दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलं आहे आणि त्यांच्या आदेशानंतरच हा खटला दाखल करण्यात आला आहे.

'ईटीव्ही भारत'च्या रिपोर्टनुसार, कंपनीचे सीएमडी निखिल नंदा, फर्मचे उत्तर प्रदेश प्रमुख, क्षेत्र व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, शाहजहांपूर डीलर आणि इतर तीन अधिकाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्यावर ट्रॅक्टर एजन्सीचे मालक जितेंद्र सिंग यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार, पापड हमजापूर गावातील रहिवासी ज्ञानेंद्र यांनी ही तक्रार दाखल केली आहे, ज्यांचा भाऊ जितेंद्र सिंग दातागंजमध्ये जय किसान ट्रेडर्स नावाची ट्रॅक्टर एजन्सी चालवत होता.

निखिल नंदा यांच्यासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

सुरुवातीला जितेंद्र त्यांचा सहकारी लल्ला बाबू यांच्यासोबत व्यवसाय सांभाळत असे, परंतु कौटुंबिक वादामुळे बाबू तुरुंगात गेल्यानंतर, जितेंद्र एकटाच एजन्सीचे काम सांभाळत होता. ज्ञानेंद्र यांनी आरोप केला की, नंदा यांनी कंपनीचे अधिकारी आशिष बालियान (क्षेत्र व्यवस्थापक), सुमित राघव (विक्री व्यवस्थापक), दिनेश पंत (यूपी प्रमुख), पंकज भास्कर (फायनान्सर कलेक्शन अधिकारी), अमित पंत (विक्री व्यवस्थापक), नीरज मेहरा (विक्री प्रमुख) आणि शिशांत गुप्ता (शाहजहांपूर डीलर) यांच्यासह जितेंद्रवर विक्री वाढवण्यासाठी वारंवार दबाव आणला. कथितरित्या, त्या सर्वांनी विक्रीचे लक्ष्य पूर्ण न झाल्यास त्याचा डीलरशिप परवाना रद्द करण्याची आणि त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची धमकी दिली होती. असे म्हटलं जातं की, जितेंद्र खूप तणावाखाली होता आणि त्याने त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्याच्या समस्या शेअर केल्या.

२१ नोव्हेंबर २०२४ रोजी, कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी त्याला पुन्हा भेटल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे दबाव वाढला. दुसऱ्या दिवशी, २२ नोव्हेंबर रोजी, जितेंद्रने आत्महत्या केली. जितेंद्रच्या कुटुंबाचा असा दावा आहे की, न्यायालयाने हस्तक्षेप करेपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. न्यायालयाच्या निर्देशानंतर, आता सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.