टॅरिफची तलवार उठताच शेअर बाजारात तेजी

टॅरिफची तलवार उठताच शेअर बाजारात तेजी

मुंबई : डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील 60 देशांवरील आयात शुल्कावर तीन महिन्यांची स्थगिती दिली होती. व्हाईट हाऊसच्या या आदेशानंतर शुक्रवारी शेअर बाजारात तेजीचा कल दिसून येत आहे, ज्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य खिळले आहे. 

शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, भारतीय शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी जबरदस्त तेजीत कामकाजाला सुरुवात केली आहे. जागतिक बाजारातील घसरणीला न जुमानता सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीला तेजीचा माहौल पाहायला मिळत आहे.

सेन्सेक्सने आदल्या दिवसाच्या 73847.15 अंकांवरून शुक्रवारी उंच उडी घेत 74835.49 वर ओपनिंग केली तर निफ्टी 22399.15 अंकांवरून आज 22695.40 उघडला. याशिवाय, क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली असून धातू आणि औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वधारले. जागतिक बाजारातून शेअर मार्केटसाठी वाईट संकेत मिळत असून आजच्या प्रमुख आशियाई बाजारात जोरदार विक्रीचा दबाव दिसून येत आहेत. त्याचवेळी गुरुवारी, टॅरिफच्या चिंतेमुळे अमेरिकन बाजारही मोठ्या घसरणीसह बंद झाले.

जगभरात हाहाकार तरी भारतीय बाजार जोमात

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर यूटर्न घेतले आणि भारतीय शेअर मार्केट पुन्हा जोमाने ट्रेड करू लागले. प्री-ओपनिंगमध्ये तेजीत सुरुवात केल्यानंतर सेन्सेक्सने ओपनिंगलाच 1000 अंकांची उडी घेतली तर निफ्टी 300 वधारला आहे. अमेरिकेसह आशियाई बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारातही भीती होती पण ट्रम्प त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफची तलवार हटवताच देशांतर्गत बाजारात खरेदीचा उत्साह वाढला आहे. बीएसई सेन्सेक्स 1079 अंकांच्या वाढीसह 74,927.09 वर उघडला त्याचवेळी, एनएसई निफ्टीने 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 22,695.40 वर ओपनिंग केली.

प्री-ओपन ट्रेडमध्ये धातू निर्देशांक 3.%% हून अधिक वधारला याशिवाय, आज टाटा आणि अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येऊ शकते. निफ्टीमध्ये सिप्ला, टाटा मोटर्स, टाटा स्टील, श्रीराम फायनान्स, हिंडाल्को हे सर्वाधिक वधारले तर टीसीएस आणि अ‍ॅक्सिस बँक सर्वाधिक तोट्यात राहिले.