महाराष्ट्रात पहिल्यांदाच शासकीय रुग्णालयात मिळणार वंधत्व उपचार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वानुसार अत्यंत कमी खर्चात पारदर्शक सेवा देणाऱ्या धर्मादाय श्रेणीतील पहिले ‘सिद्धगिरी जननी’ या आय.व्ही.एफ. टेस्ट ट्यूब बेबी सेंटर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामानाने वात्सल्य सुखापासून वंचित असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांच्यासाठी आता आय.यु.आय. सारखे महागडे उपचार आता अल्प दरात सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे उपलब्ध करण्यासाठी ‘सृष्टी वंध्यत्व निवारण सल्ला व आय.यु.आय. उपचार केंद्राचा” लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच शासकीय रुग्णालयात मिळणार वंधत्व उपचार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले, “पूर्वीच्या काळी वंध्यत्वाच्या समस्या अत्यंत कमी प्रमाणात होते. आज कालची बदलती जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे, ही एक भीषण समस्या बनत चालली आहे. लोकांनी जर वेळेत उपचार घेतले तर पुढील महागडे उपचार टाळणे शक्य होऊ शकते. परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या आशीर्वादाने सिद्धगिरी जननी सेंटच्या डॉ. वर्षा पाटील यांच्या पुढाकाराने व आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या सहयोगाने शासकीय स्तरावर हे उपचार आता मिळणार आहेत व महाराष्ट्र राज्यात याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे याचा मला अभिमान आहे.”
यावेळी बोलताना आयुक्त के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, “वंधत्व हा महिला वर्गात श्राप समाजाला जातो. मुल नसणाऱ्या स्त्रियांना अनेक ठिकाणी अवहेलना सहन करावी लागते. त्यामुळे महिलांनी महिलांच्या करिता चालवलेल्या या ‘सृष्टी’ केंद्रात डॉ. वर्षा पाटील व त्यांच्या टीम यांच्या मार्फत हजारो महिलांना याचा लाभ होणार आहे. हा प्रकल्प नक्कीच देशाला दिशादर्शक ठरेल.”
यावेळी बोलताना सिद्धगिरी जननीच्या प्रमुख डॉ.वर्षा पाटील म्हणाल्या, “ परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रेरणेने सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर व कोल्हापूर महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमानाने मोफत वंध्यत्व निवारण सल्ला केंद्र व अल्प दरात आय.यु.आय. उपचार देणारे महाराष्ट्रातील पहिले शासकीय स्तरावरील केंद्र ‘सृष्टी वंध्यत्व निवारण सल्ला केंद्र व आय.यु.आय. सेंटरचा’ लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. हि भविष्यात एक ऐतहासिक घटना ठरेल. या सेंटर मध्ये वात्सल्य सुखापासून वंचित असणाऱ्या जोडप्यांसाठी मोफत बाह्य रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे तसेच बेसिक इंट्रा यूटेराइन इन्सेमिनेशन (IUI) हि उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक दांपत्याला सुरुवातीलाच उपचार प्रक्रियेची सर्व माहिती पारदर्शकपणे दिली जाणार आहे. लोकांनी लवकर उपचार घेतले तर त्यांना IVF सारख्या महाग उपचारांची गरज लागणार नाही.”
यावेळी डॉ. विवेक हळदवणेकर म्हणाले, “आधुनिक उपचारांना आयुर्वेदिक उपचारांची जोड दिल्यामुळे अनेक वर्षांपासून मुल नसणाऱ्या दांपत्याना वात्सल्य सुख दुष्परिणामाशिवाय मिळू शकते. झाडाला फुल-फळ व महिलेला मुल नसेल तर ज्या वेदना होतात त्या वेदानांवर फुंकर मारण्याचे काम या सेंटर मार्फत करण्यात येणार आहे.” यावेळी सूत्रसंचालन व आभार विवेक सिद्ध तर प्रास्ताविक डॉ. प्रकाश पावरा यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त प्रीतोष कंकाळ, शहर अभियंता मस्कर, डॉ. वृषाली घोरपडे, डॉ.भूषण सुतार, विवेक सिद्ध, सुजित पाटील, कुमार चव्हाण, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, डॉ. अमोलकुमार माने, डॉ. संजना बागडी यांच्यासह आशा सेविका व सिद्धगिरी - सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.