'या' वादग्रस्त उड्डाणपुलाबाबत मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा निर्णय

नंदुरबार - नंदुरबार शहरातील नागरिकांसाठी एक आनंददायक निर्णय घेण्यात आला आहे. शेवाळी ते नेत्रग महामार्गावरील तुलसी हॉस्पिटलपासून संत कवरदास चौकापर्यंत नियोजित असलेल्या उड्डाणपुलाची निविदा रद्द करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नागरिकांच्या विरोधाची माहिती दिल्यानंतर गडकरी यांनी तात्काळ ही निविदा रद्द करण्याचे आदेश दिले.
या उड्डाणपुलाला स्थानिक व्यापारी, रहिवासी आणि भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होत होता. या भागात शाळा, कॉलेज, मंदिरे आणि दाट वस्ती असल्यामुळे उड्डाणपूल झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असता. तसेच, हा पूल तांत्रिकदृष्ट्या देखील योग्य नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली होती.
विजय चौधरी यांनी नागपूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गडकरी यांना निवेदन दिले. या भेटीनंतर गडकरी यांनी सी.बी. पेट्रोल पंप अर्थात तुलसी हॉस्पिटलपासून संत कवरदास चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाची निविदा रद्द करून काम पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील नवापूर चौफुली, धुळे चौफुली, करण चौफुली आणि सी.बी. पेट्रोल पंप येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत, मात्र तुलसी हॉस्पिटल ते संत कवरदास चौक या भागातील पूल नागरिकांच्या दृष्टीने अनावश्यक होता. त्यामुळे हा निर्णय शहरातील व्यापारी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनासाठी मोठा दिलासा ठरला आहे.
काही नागरिकांनी सांगितले की, या पुलामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा अधिक पैसा वाया जाणार होता, त्यामुळे त्याला वेळेवर स्थगिती मिळाल्याने सार्वजनिक हित जोपासले गेले आहे.