रस्ते, पाण्यासह रोजगार निर्मितीसाठी काम करणार - अमल महाडिक

रस्ते, पाण्यासह रोजगार निर्मितीसाठी काम करणार - अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - उपनगरांमधील रस्ते व पाण्याच्या समस्यांसाठी शाश्वत काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. याशिवाय परिसरातील नागरिकांच्या रोजगार निर्मितीसाठी सुद्धा पुढाकार घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांनी केले. 

सानेगुरुजी वसाहत, बिडी कामगार वसाहत तसेच महीपतराव बोन्द्रेनगर परिसर याठिकाणी ते मतदारांशी संवाद साधत होते. परिसरातील नागरिकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परिसरातील महिलांनी येथील सांडपाण्याच्या समस्यांबाबत आपले गाऱ्हाणे अमल यांच्यासमोर मांडले. आम्हांला आश्वासने नको आहेत. प्रत्यक्ष काम करणारा नेता हवा आहे, अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केला. 

महाडिक यांनी येथील युवा मतदारांशी बोलताना, त्यांच्यातील कौशल्यांचे कौतुक केले. महायुती सरकारच्या विद्यावेतन व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. तरुणांसाठी रोजगार निर्मिती हे सरकारचे मुख्य ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले. 

मतदारसंघातील सर्व युवकांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी शिबिरे व कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी त्याबाबतचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण याचाही यात समावेश आहे असे सांगत त्यांनी तरुणांना सोबत राहण्याचे आवाहन केले. 

महिला व ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी सरकारच्या कल्याणकारी योजनांसाठी धन्यवाद मानले. अडीच वर्षात आयुष्य बदलून गेल्या असल्याच्या भावनिक प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या. आजवर दुर्लक्षित असलेल्या घटकांसाठी विविध योजना राबवून सरकारने ते सर्वसमावेशक असल्याचे सिद्ध केले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. 

यावेळी महाडिक यांनी महायुती सरकारच्या पुढील विकासात्मक अजेंड्यासाठी मला २० नोव्हेंबर रोजी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन केले. 

यावेळी माजी नगरसेविका मनीषा कुंभार, सोमनाथ सुतार, वैभव कुंभार, बळवंत पाटील, प्रेमा बोरगे, श्रद्धा चोपडे, ज्योती घोडके, मालुबाई सुतार, मोहन खोत, नंदा पाटील सुनीता पाटील यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक यांच्या भेटी महाडिक यांनी घेतल्या.