बिद्री बंद पाडण्याचा प्रयत्न करणारे आमदार आबिटकर 'सह्याद्री' उभा करायची भाषा कशीकाय बोलतात ? - फिरोजखान पाटील, यांचा सवाल

बिद्री बंद पाडण्याचा प्रयत्न करणारे आमदार आबिटकर 'सह्याद्री' उभा करायची भाषा कशीकाय बोलतात ? - फिरोजखान पाटील, यांचा सवाल

*सत्तेत असतांना तुम्ही हे का नाही केले ? उमेश भोईटे* 

राधानगरी (प्रतिनिधी) :  राज्यात भारी चालविलेला बिद्री साखर कारखाना बंद पाडण्यासाठी व त्या माध्यमातून चेअरमन असलेल्या के पी पाटील यांची प्रतिमा डागाळण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करणारे आमदार आबिटकर आता सह्याद्री आणि देवर्डे कारखाना उभा करण्याच्या गप्पा झोडत आहेत. ज्यांनी बिद्री बंद पाडण्याचा प्रयत्न केला ते आता ही भाषा कशी काय बोलतात ? असा सवाल बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोजखान पाटील यांनी केला. तर, गेली १० वर्षे सत्तेत असताना तुम्ही हे का नाही केले असा सवाल उमेश भोईटे यांनी विचारला.

तुरंबे (ता.राधानगरी) येथे झालेल्या प्रचार सभेत हे दोघे बोलत होते.

 पाटील पुढे म्हणाले,"बिद्री म्हणजे ४ तालुक्यांतील ६५ हजार सभासदांच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू आहे. त्याचे नेतृत्व करणारे के पी पाटील यांना सातत्याने शत्रू मानून बिद्री बंद पाडून त्यांची प्रतिमा मलिन करायची व विधानसभेच्या रिंगणातील बलाढ्य विरोधकालाच शह द्यायचा असले घाणेरडे राजकारण विद्यमान आमदारांनी केले आहे."

संचालक उमेश भोईटे म्हणाले," आमदार आबिटकर हे केवळ मतांवर डोळा ठेवून धामोडचा कै.नवणे अण्णांचा सह्याद्री साखर कारखाना आणि देवर्डे साखर कारखाना उभा करण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगत आहेत. मग हे करण्यासाठी १० वर्षे सत्तेत असतांना त्यांचे हात कोणी बांधले होते का? सह्याद्री साखर कारखाना गेली कित्येक वर्षे सुरू होण्याच्या प्रतीक्षेतच असून देवर्डे येथील नियोजित साखर कारखाना २५ वर्षांच्या कराराने बीओटी तत्त्वावर दुसऱ्या कुणालातरी चालविण्यास देणार असल्याची चर्चा आहे. मात्र आमदार आबिटकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर या कारखान्यांना उभारी देण्याची भाषा बोलतात ही खूप मोठी विसंगती आहे."

मालोजी साबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी आमदार के पी पाटील,हिंदुराव चौगले,बाळासाहेब पाटील,भिकाजी एकल, वसंतराव पाटील,शरद पाडळकर आदींची भाषणे झाली. रमेश वारके,ॲड. बाळासाहेब भावके, शामराव भोई,नामदेव किल्लेदार संभाजी भोईटे,अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी नॅशनल ब्लॅक पॅंथर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुनील पाटील,उमेश कांबळे तसेच क्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र भोईटे यांनी के पी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. सभेपूर्वी अर्जुनवाडा,तिटवे, डवरवाडी,फराळे,

धनगरवाडा आदी ठिकाणी प्रचारदौरा झाला.

 

*आबिटकरांची ठोकशाही लोकशाहीला मारक ...*

के पी पाटील म्हणाले,"राजकारणात विरोधक जरूर असावेत;परंतु चांगल्यालासुद्धा विरोध आणि जेथे जाईल तेथे ठोकशाही पद्धत वापरायची हे बरोबर नाही. बिद्री बंद पाडण्यासाठी दबाव आणून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करणे आणि विविध शासकीय कार्यालयांत खरे-खोटे, चूक-बरोबर न पाहता ठोकशाहीचा अवलंब करणे ही आमदारांची कृती लोकशाहीला मारक ठरल्याचे गेल्या दहा वर्षांत दिसून आले असून असली ठोकशाही जनता या निवडणुकीत झुगारून देईल."