राज्य गुणवंत कामगार असोसिएशन हि कामगारांची हित जोपासणारी संघटना : रविराज इळवे
कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन ही कामगारांचे सर्वार्थाने हित जोपासणारी संघटना आहे, असे मत राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने आयोजित राज्य अधिवेशनामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी व्यक्त केले.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रीडा, संघटना व आस्थापना तसेच समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासन यांचेवतीने गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
अशा समाजकार्याने प्रभावित झालेल्या 36 जिल्ह्यातील प्रमुख गुणवंत कामगारांनी एकत्र येऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेची शासन दरबारी नोंदणी केलेली आहे.
या असोसिएशनच्यावतीने कोल्हापूरमधील शाहू स्मारक भवन येथे पहिले राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आलेले होते. या अधिवेशनाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, महाराष्ट्र कल्याण मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले, निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने तसेच राज्याच्या सर्व जिल्ह्यातील असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, विभागिय सदस्य व गुणवंत कामगार उपस्थित होते.
यावेळी अधिवेशनामध्ये सहभागी सर्वच गुणवंत कामगारांचा गौरवचिन्ह, सहभाग प्रमाणपत्र, कोल्हापूर फेटा व त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरवअंक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी कामगारांच्या समोरील सध्याच्या काळात असलेल्या विविध अडचणी, त्यांच्या व्यथा, केंद्र सरकारचे भांडवलशाही धोरण, बदलते कामगार कायदे, सेवानिवृत्ती नंतर मिळणारी तुटपुंजी पेन्शन आदी बाबत परखड मते व्यक्त करून २९ मे रोजी कोल्हापुरात कामगारांच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभा करणार असे स्पष्ट केले.
निर्मिती विचार म्हणजे अनिल म्हमाने यांनी संघटना बांधणी व तिचे महत्व विशद करून, भविष्य काळामध्ये जर आपण संघटित राहिलो तरच कामगारांचे अस्तित्व शिल्लक राहणार आहे असे परखड मत व्यक्त करून विविध संघटना व विविध चळवळी त्यांच्यामध्ये सुरू असलेले राजकारण, हेवेदावे यामुळेच कामगार वर्ग तसेच चांगल्या चळवळी अडचणीत येत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या समाजाभिमुख उपक्रमांसाठी यापुढील काळातही भरीव योगदान देऊन, असोसिएशनचा नावलौकिक वाढवण्यासाठी मी सदैव सहकार्य करीन अशी उपस्थित सर्वांना ग्वाही दिली.
असोसिएशनचे सचिव अच्युतराव माने यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले. रोपाला पाणी घालून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी प्रास्ताविकामध्ये राज्यातील गुणवंत कामगारांच्या विविध मागण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका अंगीकारावी तसेच राज्यातील विविध महामंडळाच्या माध्यमातून पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांना मिळणारे विविध लाभ व सोई सवलती, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांना देणेबाबत शासन स्तरावरती पाठपुरावा करावा, अशी विनंती कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना केली. ज्यायोगे यापुढील काळातही गुणवंत कामगार सर्वार्थाने समाज कार्यासाठी झोकून देतील. यासाठी मंडळाचे कल्याण आयुक्त व भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष यांनी शासनाकडे याबाबत सकारात्मक पाठपुरावा करून, राज्यातील गुणवंत कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली.
अधिवेशनामध्ये राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्यावतीने विविध ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये
महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळाच्यावतीने ज्याप्रमाणे पुरस्कार्थीना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून सवलत मिळते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने गुणवंत कामगारांना एस. टी. ने प्रवास करतेवेळी सवलत मिळावी.
गुणवंत कामगारांना वयाच्या 70 वर्षापर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती दिली जाते. त्यामुळे वयाची अट रद्द करून, तहयात नियुक्ती करणेत यावी.
गुणवंत कामगारांना राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करतेवेळी टोल माफ करावा.
गुणवंत कामगारांना रेल्वेने प्रवास करीत असताना इतर पुरस्कार्थीप्रमाणे रेल्वे तिकीट दरामध्ये सूट मिळावी.
गुणवंत कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या इतर पुरस्कार्थीप्रमाणे शासनाच्या सर्व आरोग्य विषयक सुविधा मोफत मिळाव्यात.
गुणवंत कामगारांना सामाजिक व विधायक कार्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते, त्यावेळी त्यांना इतर पुरस्कार्थीप्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात शासकीय विश्रामगृह मिळावे.
गुणवंत कामगारांना शासनाच्या विविध कार्यक्रमांना ऑन ड्यूटी उपस्थित राहणेबाबत, संबंधित आस्थापनांना आदेश व्हावेत.
गुणवंत कामगारांचा स्थानिक, तालुका व जिल्हा पातळीवरती सर्व शासकीय कमिटीमध्ये समावेश करावा, याकरीता
मंडळाच्या वतीने शासनाकडे शिफारस करावी.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संचालक पदी 2 गुणवंत कामगारांची नियुक्ती करावी.
राज्यपाल कोट्यातून राज्यातून एका गुणवंत कामगाराची "आमदार" पदी नियुक्ती करणेत यावी.
गुणवंत कामगारांना शासनाच्या कामगार विभागामार्फत ओळखपत्र देण्यात यावे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने पूर्वीप्रमाणे फक्त आणि फक्त कामगार साहित्यिकांसाठी साहित्य संमेलन आयोजित करणेत यावे.
गुणवंत कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणामध्ये भरीव सवलती मिळाव्यात.
पंढरपूरच्या आषाढीवारीची कामगार दिंडी पूर्ववत सुरू करावी.
स्थानिक जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कामगार कल्याण संदर्भात तसेच जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न चर्चेत येणे करीता, समिती गठित करून त्यामध्ये गुणवंत कामगार, स्थानिक कामगार अधिकारी व संघटना प्रतिनिधी यांचा समावेश करणेत यावा.
गुणवंत कामगारांना कामगार मंडळाच्यावतीने देण्यात आलेले प्रमाणपत्र कांही आपत्कालीन परिस्थितीमुळे अथवा गहाळ झाले असेल तर, त्यांच्या मागणीनुसार त्यांना नवीत प्रमाणपत्र देण्यात यावे.
गुणवंत कामगारांना कामगार मंडळाच्यावतीने ओळखपत्र देण्यात येते. मात्र आजअखेर ज्यांना ओळखपत्रे देण्यात आलेली नाहीत, त्या सर्व गुणवंतांना त्यांच्या लेखी मागणीनुसार ओळखपत्रे देण्यात यावीत.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सर्वच कार्यक्रमांना गुणवंत कामगारांना प्राधान्याने आमंत्रित करण्यात यावे व यथोचित सन्मानित करणेत यावे.
महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्या कारणाने, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार संख्या ५१ वरून १०० पर्यंत करावी. तसेच कामगार भूषण पुरस्कारांची संख्या विभाग वाईज एक वरून सात पर्यंत करावी.
गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळालेल्या कामगारांना अतिरीक्त वेतनवाढ मिळणेबाबत संबंधित आस्थापनांना मंडळाच्यावतीने लेखी पत्रव्यवहार करावा.
गुणवंत कामगारांना इतर पुरस्कार्थीप्रमाणे विविध क्षेत्रातील माहिती अवगत व्हावी यासाठी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने विविध संस्था तसेच विदेशी सफर घडविण्यात यावी.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ज्या योजना कांही तांत्रिक कारणास्तव बंद आहेत, त्या पूर्ववत सुरु कराव्यात.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी स्पर्धकांना तुटपुंजे मानधन मिळते, त्यामध्ये भरीव वाढ करावी.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने आयोजित विविध योजनांच्या नियमावलीमध्ये बदल करणेत यावा.
कामगार मंडळाच्यावतीने गुणवंत कामगारांची सल्लागार समिती व कार्यकारी समितीवर नियुक्ती करावी.
लोक कलावंतांप्रमाणे गुणवंत कामगारांना, सेवा निवृत्तीनंतर पेन्शन स्वरुपात मानधन मिळावे यासाठी, मंडळाने शासनाकडे शिफारस करावी.
सेवा निवृत्त औद्योगिक कामगारांना रुपये ७५००/- पेक्षा जास्त पेन्शन मिळावी व त्यामध्ये महागाई नुसार सातत्याने वाढ व्हावी.
सदर अधिवेशनामध्ये विविध गुणवंत कामगारांनी आजच्या अधिवेशनाबाबत सकारात्मक मते नोंदवून लवकरात लवकर असोसिएशनच्यावतीने दुसरे अधिवेशन मुंबई येथे घेण्याबाबत आवाहन केले.
अधिवेशनाच्या सांगता समारंभावेळी सभागृहामध्ये राष्ट्रगीताचे गायन केले.
असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र रहाटे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले व अधिवेशनाचा समारोप केला.