रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम उत्साहात संपन्न

कोल्हापूर - सचोटीने वागा ; जग तुमची किंमत करेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी संपत खिलारी हे होते.
डॉ.लवटे पुढे म्हणाले , समाजासाठी प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करून रोटरी सेंट्रलने समाजातील चांगुलपणाला बळ दिले आहे. रोटरी सेंट्रलची कौतुकाची थाप ही नव्या उमेदीने या सर्वांना काम करण्यासाठी प्रेरणा देईल, असेही त्यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी सांगितले की, पुरस्कार विजेत्यांचे कार्य आणि वय यांचे वैविध्य साधून रोटरी सेंट्रलने सामाजिक कार्य करणाऱ्यांचा जणू स्नेह मेळावा आयोजित केला आहे. प्रशासकीय सेवेतील बऱ्याच वर्षात काळात असा परिपूर्ण कार्यक्रम अनुभवता आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात तेज कुरिअरच्या साधना घाटगे, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून कार्यरत असणारे डॉ.विजय करंडे, सचोटीने व्यवसाय करून लोकांना सेवा देणाऱ्या मालन सोलप, ब्लड प्लेटलेट डोनर सागर पोतनीस, वृक्ष संवर्धनासाठी कार्यरत वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तत्पर बावडा रेस्क्यू फोर्स, स्त्रीभ्रूणहत्या आणि बोगस डॉक्टर या विरोधात खमकी भूमिका घेणाऱ्या गीता हसूरकर, वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत उमेद फाउंडेशन, पर्यावरण ,आरोग्य, रस्ता सुरक्षा यासाठी काम करणाऱ्या मुलींची ड्रीम टीम फाउंडेशन , अंध मुलांना प्रशिक्षण देऊन टुरिस्ट गाईड बनविणारे वसीम सरकवास यांना गौरवण्यात आले.
प्रास्ताविक क्लब कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. क्लब प्रेसिडेंट संजय भगत यांनी रोटरी सेंट्रलच्या वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी सेक्रेटरी रवींद्र खोत यांच्यासह अवॉर्ड कमिटी मेंबर राजेश आडके, संजय कदम, संग्राम सरनोबत, रोटरॅक्ट सेंट्रलचे प्रेसिडेंट अनिकेत सावंत,चैत्राली शिंदे यांच्यासह रोटरी सेंट्रलचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.