बाजार समितीतील त्या कर्मचाऱ्यांबाबत नाथाजी पाटील, भगवान काटे यांची जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार

बाजार समितीतील त्या कर्मचाऱ्यांबाबत नाथाजी पाटील, भगवान काटे यांची जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुर जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीरीत्या भरती केलेल्या २९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केल्यास समितीवर आर्थिक संकट ओढवेल. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कायम करू नये, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील व बाजार समितीचे माजी संचालक भगवान काटे यांनी आज लेखी पत्राद्वारे जिल्हा उपनिबंधकांकडे केली. 

बाजार समितीमध्ये २०१५ ते २०२० या कालावधीतील तत्कालीन संचालक मंडळाने २९ कर्मचाऱ्यांना रोजंदारी पद्धतीने भरती केले होते. यात बहुतांशी संचालकांच्या नात्यातील उमेदवारांचा समावेश होता. त्यावर विविध तक्रारी झाल्या. तसेच जिल्हा उपनिबंध कार्यालयाकडून झालेल्या चौकशीत ही रोजंदारी कर्मचारी भरती

बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर याबाबत कामगार न्यायालयाकडे भरती संदर्भात याचिका दाखल झाल्या. तेव्हापासून रोजंदारी कर्मचारी समितीत काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत समितीचे विद्यमान संचालक मंडळ हालचाली करत आहे. बेकायदेशीर भरती झालेल्या 'त्या' २९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास समितीवर आर्थिक बोजा वाढेल. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे हेही नियमाचे उल्लंघन ठरेल. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करू नये अशा आशयाच्या लेखी सूचना बाजार समितीला द्याव्यात, अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.