लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना डच्चू, ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना डच्चू, ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक - नाशिकमध्ये शिवसेना (ठाकरे गट) चा निर्धार मेळावा पार पडला असून, या मेळाव्यात युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. "लाडकी बहीण" योजनेतील लाभार्थ्यांची संख्यात्मक कपात करत सरकार ही योजना बंद करण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांनी स्पष्ट केलं की, सुरुवातीला अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र आतापर्यंत 8 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं असून, आणखी 50 लाख महिलांना योजना बाहेर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचं ते म्हणाले.

काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, ते आता परत घेतले जात आहेत. काहींवर तर पोलिस कारवाईचीही शक्यता आहे, असं सांगत ठाकरेंनी आरोप केला की, लिहून ठेवा – यांचेच कोणी कोर्टात जाईल आणि कोर्टाच्या नावावर ही योजना बंद केली जाईल.

यासोबतच त्यांनी 100 दिवसांच्या कार्यकाळात सरकारने एकही चांगली योजना आणली नाही, अशी टीका करत सत्ताधाऱ्यांच्या जाहीरनाम्यावरील वचनपूर्तीचाही पाढा वाचला. त्यांनी जाहीरनाम्याच्या आश्वासनांचीही आठवण करून दिली – तुम्ही 2100 रुपये देतो म्हणालात, आम्ही तर 3000 रुपये देणार होतो. पण आता केवळ 500 रुपये मिळतायत.