वारणा विद्यापीठ आणि टेलर्स विद्यापीठ मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा

वारणा विद्यापीठ आणि टेलर्स विद्यापीठ मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा

कोल्हापूर प्रतिनिधी : वारणा विद्यापीठ आणि टेलर्स विद्यापीठ, मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परिणामासाठी शिक्षण: उद्देश, सजगता आणि हवामान-जागरूक कृतीद्वारे उच्च शिक्षणाचे रूपांतर’ या संकल्पनेवर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा पीएमउषा योजनेअंतर्गत उद्देशपूर्ण शिक्षण आणि ग्रीन कॅम्पस या विषयावर केंद्रित होती. या कार्यशाळेसाठी तात्यासाहेब ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी- डिग्री डिप्लोमा, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी- डिग्री डिप्लोमा, तात्यासाहेब कोरे शिक्षणशास्त्र महाविद्यालय या महाविद्यालयामधून ६० हुन अधिक प्राध्यापकानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यशाळेत टेलर्स विद्यापीठाच्या डॉ. प्रवीणा नायर शिवशंकरन, संचालक, इम्पॅक्ट लॅब क्लीन टेक्नॉलॉजी, यांनी उच्च शिक्षणातील उद्देश शिक्षण, सजगता आणि शाश्वत विकास उद्दिष्टे या विषयावर मार्गदर्शन केले. उच्च शिक्षण संस्थांनी शाश्वत विकासासाठी सकारात्मक भूमिका बजावावी, असे त्यांनी प्रतिपादन केले.

तसेच, डॉ. नागेन्ट्राऊ मुनिअँडी, व्यावसायिक अभियंता आणि ऊर्जा कार्यक्षमता तज्ञ, यांनी ‘कमी कार्बन कॅम्पसच्या दिशेने ऊर्जा संवर्धन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शैक्षणिक परिसंस्थांनी ऊर्जा संवर्धनाच्या उपाययोजना राबवून पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारावा, असा संदेश त्यांनी दिला.

ही कार्यशाळा पर्यावरण-जागरूकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, उच्च शिक्षण संस्थांनी शाश्वत भविष्यासाठी कृतीशील होण्याची गरज असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी वारणा उद्योग व शिक्षण समूहाचा इतिहास व टेलेस युनिव्हर्सिटी मलेशिया बद्दलच्या भविष्यकाळातील योजनांची माहिती दिली.

कार्यशाळेसाठी वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून, डॉ. कल्पना एस. पाटील,संचालक, विद्यार्थी विकास, डॉ. उमेश बी. देशन्नवर, संचालक, नवोपक्रम, संशोधन आणि भागीदारी यांनी काम पाहिले. 

सल्लागार समिती म्हणून डॉ. बी. टी. साळोखे, प्राचार्य, टीकेआयईटी, डॉ. एस. एम. पिसे,अधिष्ठाता, डॉ. ए. एम. शेख, प्राचार्य, वारणा महाविद्यालय,डॉ. किरण एस. पाटील, प्राचार्य, फार्मसी कॉलेज, डॉ. एस. व्ही. खंडाल, रजिस्ट्रार,डॉ. एस. आर. कुंभर, संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन यांनी काम पाहिले.डॉ. मार्क मोनिस यांनी सूत्रसंचालन केले.