विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

कोल्हापूर - शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यापुरते मर्यादित नसून, व्यक्तिमत्व विकासासाठी देखील ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले. डी. वाय. पाटील विद्यानिकेतन (सीबीएसई), साळोखेनगर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
आपल्या भाषणात शेंडकर यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन आणि गुणवत्ता आधारित शिक्षणाची महत्ता पटवून दिली. यावेळी पालक वर्गालाही त्यांनी पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.वाय. पाटील कॉलेज कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने होते. प्राचार्या डॉ. शांतीकृष्णमूर्ती यांनी स्वागत आणि प्रस्ताविक करताना शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शाळा त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, नाट्य व गीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण रंगतदार केले. पालक आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलेला भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाला संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त श्री. ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.