विकसित महाराष्ट्र 2047 च्या अनुषंगाने 17 जुलै पर्यंत नागरिकांनी सर्वेक्षणात सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - विकसित महाराष्ट्र 2047 करिता व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश 150!दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आला आहे. विकसित महाराष्ट्र 2047 चे नागरिक सर्वेक्षण 17 जुलै 2025 पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरविण्यात नागरिकांनी सर्वेक्षणात सहभाग घ्यावा, असे आवाहन नियोजन विभागामार्फत करण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत -भारत@2047 करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2029 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चे व्हिजन जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मे ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 150 दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंट चा आराखडा तयार करण्यासाठी 16 संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगरविकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास/ मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणात सामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, जेणेकरून त्यांच्या समस्या, शासनाकडून असलेल्या अपेक्षा याबाबत माहिती घेऊन, त्यानुसार रोडमॅप तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे विकसित महाराष्ट्र 2047 करिता नागरिक https://wa.link/o93s9m या लिंकवर क्लिक करून जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.