विकासासाठी कोल्हापूर जिल्हा सर्वोत्तम - पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) मार्फत कोल्हापूर जिल्हयात सयाजी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हयात विकासाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या विभागांसमवेत उद्योजकांनी सामंजस्य करार केले.
सकाळी ११.०० वाजता परिषदेचे उद्घाटन वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मित्र संस्थेचे सीईओ प्रविण परदेशी, जॉइंट सीईओ सुशील खोडवेकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जॉइंट सीईओ अमन मित्तल, जागतिक बँकेचे अधिकारी विजय के., आयुक्त वस्त्रोद्योग अवश्यंत पांडा, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस. आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी करून जिल्हयात पहिली परिषद घेतल्याबद्दल मित्र संस्थेचे आभार मानले.
क्रेडाई कोल्हापूर आणि ॲडव्हेन्चर टुरीझम ऑपरेटर यांचे सोबत पर्यटन विभागाचे सामंजस्य करार मान्यवरांच्या उपस्थित झाले. यानंतर उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, पर्यटन, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया या पाच विषयांवर चर्चासत्र संपन्न झाली. यात सहभागी होण्यासाठी जिल्हयाबाहेरील तसेच जिल्हयातील मोठमोठे उद्योग व्यावसायिक सहभागी होते. याच पाच विषयांवर चर्चासत्रासाठी पॅनलही नेमण्यात आले.
विकासासाठी कोल्हापूर जिल्हा सर्वोत्तम – पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर जिल्हयात राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी होत असून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला परिषदेचे आयोजन केलेबद्दल मित्रा संस्थेचे विशेष आभार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मानले. कोल्हापूरच्या विकासाचा पाया आणि विकासाला गती देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. शाहू मील, उद्यमनगरी, कृषी, क्रीडा अशा अनेक मार्गातून जिल्हयाला शाश्वत विकासाची सुरूवात करून दिली. त्यामुळेच आजही हा जिल्हा प्रत्येक क्षेत्रासाठी गुंतवणूक करण्यासाठी चांगला असून विकासासाठी सर्वोत्तम जिल्हा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगलीत येणाऱ्या पुर निवारणासाठी नुकतेच ३२०० कोटी रूपये जागतिक बँकेकडून मिळणार आहेत. भविष्यात यामुळे या सर्व शहरात पूर येणारच नाही, असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विकासाला बाधा येणार नाही. जिल्हयातील दरडोई उत्पन्न अडीच लाखाहून सहा लाखांपर्यंत न्यायचे आहे. यातून कोल्हापूर जिल्हा देशात अग्रक्रमांकावर नेण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.