प्रमुख रस्त्यांच्या निधीसाठी आमदार अमल महाडिक यांनी घेतली नितीन गडकरींची भेट
नागपूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गांच्या काँक्रिटीकरण डांबरीकरणासह रुंदीकरणासाठी आमदार अमल महाडिक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे 83 कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी नागपूर येथे गडकरी यांना दिले. राष्ट्रीय रस्ते निधी ३ व ४ अंतर्गत हा निधी मिळावा असा प्रस्ताव महाडिक यांनी सादर केला. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापुरातील आयटीआय ते पाचगाव-गिरगाव- वडगाव-नंदगाव-खेबवडे ते बाचणी प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३० या रस्त्याच्या रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण गटर्स बांधणी मोरी उभारणी या कामासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार महाडिक यांनी केली आहे.
त्याचबरोबर कात्यायनी मंदिर-दऱ्याचे वडगाव ते सिद्धनेर्लीला जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्र.36 या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरण काँक्रिटीकरणासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील जाजल पेट्रोल पंपापासून कणेरी -- नंदवाळ -वाशी -महे -कोगे -कुडित्रे फॅक्टरी- वाकरे फाटा -यवलुज तसेच टोप-नागाव-मौजे वडगाव-हेरले-रुकडी-चिंचवाड-वसगडे-सांगवडे-हलसवडे- विकास वाडी ते जाजल पेट्रोल पंप या रस्त्यासाठी 15 कोटी आणि कोल्हापूर शहरा बाहेरील वळण रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार पासून शाहू नाका, कळंबा-साळोखे नगर ते शाहू नाका-उजळाईवाडी विमानतळ या रस्त्याच्या रुंदीकरण कॉंक्रिटीकरण डांबरीकरणासह आरसीसी गटर्स उभारणीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी आमदार महाडिक यांनी केली आहे.
याशिवाय जाजल पेट्रोल पंपापासून कणेरी-गिरगाव-नंदवाळ-वाशी-महे-कोगे-वाकरे फाटा-खुपिरे-केर्ली आणि टोप-नागाव-मौजे वडगाव-हेरले-रुकडी,चिंचवाड वसगडे, सांगवडे, हलसवडे रस्त्यासाठी 13 कोटी रुपयांचा निधी आमदार महाडिक यांनी मागितला आहे. या रस्त्यांचे रुंदीकरण-काँक्रिटीकरण झाल्यास भविष्यातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. ही बाब आमदार महाडिक यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.
या मागण्यांचा सकारात्मक विचार करून निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही नामदार नितीन गडकरी यांनी दिली. तसेच प्रस्ताव सादर करण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.