विमानतळाला स्वतंत्र सुरक्षा दलासाठी गृहविभागाकडे प्रस्ताव...

विमानतळाला स्वतंत्र सुरक्षा दलासाठी गृहविभागाकडे प्रस्ताव...

विमानतळावर २४ तास कडेकोट सुरक्षा तैनात करावी लागते. पोलिसांना कामात मर्यादा येत असतात, त्यामुळे विमानतळासाठी स्वतंत्र्य सुरक्षा दलाला मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गृह विभागाकडे पाठवला आहे. या दलासाठी १३७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गरज आहे. याला मंजुरी मिळाल्यास सर्व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवून त्यांना प्रशिक्षित केले जाईल, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली. 

सध्या जिल्हा पोलिस दलातील ४४ पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ४४ कर्मचारी, अशा ८८ कर्मचाऱ्यांकडे विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेचा भार आहे. देशभरातील विमानतळांशी वाढणारा संपर्क आणि प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था भक्कम करणे आवश्यक आहे. उजळाईवाडी येथील विमानतळावरून दररोज रोज चार ते पाच विमानांचे उड्डाण होते. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा आणि तपासणीसंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असते. अन्यथा सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्यास विमानतळावर आणि विमान प्रवासात गंभीर धोका उद्भवू शकतो. असे प्रसंग टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वतंत्र सुरक्षा दलाचा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला आहे.