आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या माध्यमातून व जिल्हा योग संघटनेच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे 21 जून रोजी सकाळी 6.45 वा. योग दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.
शारीरिक व अध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी दिनांक 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी 21 जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. योग दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्विकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी. सी, मेरा युवा भारत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी सुद्धा आपआपल्या ठिकाणी 11 वा. आंतरराष्ट्रीय योग दिन भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉल नुसार साजरा करावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रोटोकॉल बाबतची सविस्तर माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.