उद्याच्या भारताचे शिल्पकार घडवताना – कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनचा संस्मरणीय समर कॅम्प

उद्याच्या भारताचे शिल्पकार घडवताना – कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनचा संस्मरणीय समर कॅम्प

कोल्हापूर -  कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनच्या वतीने नुकताच एक पाच दिवसांचा समर कॅम्प मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कॅम्पमध्ये एकूण ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि विविध क्षेत्रांतील ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा मिळवून समृद्ध झाले.

या शिबिराचे आयोजन श्रुती चौगुले, श्रेया चौगुले, आर्पिता राऊत आणि आंचल काट्यारे यांनी डॉ. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यामध्ये संस्थेचे स्वयंसेवक अद्वित काट्यारे, सुप्रिया चौगुले, शैलजा राऊत, सविता साळोखे, श्रावणी पाटील, रिद्धी दीक्षित, निधी मुसळे, श्रावणी बांदिवडेकर, ईशा गुरव, दिया आहुजा, सानिका चव्हाण, सोफिया मेस्त्री, वैष्णवी व सिया यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

शिबिराच्या पहिल्या दिवशी ‘वृक्षप्रेमी’ संस्थेच्या सहकार्याने पक्षांसाठी बर्ड फीडर बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हा न्यायालय भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत न्यायाधीश व वकिलांशी थेट संवाद साधताना मुलांना न्यायालयीन प्रक्रिया समजून घेता आली. तिसऱ्या दिवशी मराठा बटालियन कोल्हापूर येथे भेट देण्यात आली. त्या दिवशीच दुसऱ्या सत्रात गोकुळ दूध प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे भेट घेण्यात आली. चौथ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या स्पेस रिसर्च सेंटर, पन्हाळा येथे भेट दिली. या दिवशी रात्री पन्हाळा येथे मुक्कामही करण्यात आला, ज्याचा अनुभव मुलांसाठी अविस्मरणीय ठरला. शिबिराच्या शेवटच्या दिवशी पावनगड ट्रेक आयोजित करण्यात आला, इतिहास अभ्यासक मंशिंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना गडाचा इतिहास व त्यामागील महत्त्व पटवून दिले. ट्रेकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वराज्याच्या इतिहासाची जवळून ओळख झाली.

हे शिबिर मुलांसाठी केवळ एका सहलीपुरते मर्यादित न राहता, त्यांना जीवनात काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा देणारं ठरलं. या समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास, उत्साह आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे. कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशन अशाच प्रकारच्या उपक्रमांद्वारे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार आहे.