शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत २२१ बाल मल्लांचा सहभाग

शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत २२१ बाल मल्लांचा सहभाग

कागल (प्रतिनिधि) : येथील श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित मॕटवरील कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी बाल गटात उच्चांकी २२१ मल्लांनी सहभाग नोंदविला. कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून छ शाहू जयंती निमित्त घेण्यात येत असलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते झाले.यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ,सर्व संचालक,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांचेसह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

कुस्ती शौकीनांना घरबसल्या या स्पर्धा पाहता येण्यासाठी कुस्ती हेच जीवन या फेसबुक पेज व युट्यूब चॕनेलवरून ऑनलाइन प्रक्षेपण सुरु आहे.स्पर्धेचे संपुर्ण नियोजन ऑलिम्पिक पद्धतीने केले आहे.

   छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे व क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमेसह मॕट पूजन घाटगे यांनी केले. खेळाडूंनी मानवंदना देऊन क्रीडा शपथही घेतली.सकाळी शाहू उद्यानातून खेळाडूंनी क्रीडा ज्योत कार्यस्थळापर्यंत आणली. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन ऑलिंपिक पद्धतीने केले आहे. 

पंच म्हणून बटू जाधव,संभाजी पाटील, बाळासो मेटकर,नामदेव बल्लाळ, रवींद्र पाटील, प्रकाश खोत, के.बी.चौगुले, बापू लोखंडे, सुरेश लंबे,सुरज मगदूम, मुकुंद वाडकर,मलकारी पुजारी,रामा माने, दत्तात्रय एकशिंगे,गजानन खराडे,अशोक फराकटे, रामदास लोहार आदी काम पाहत आहेत. राजाराम चौगुले व कृष्णा चौगुले यांनी निवेदन केले.

 *विविध ३४ गटात स्पर्धा*

     या कुस्ती स्पर्धा चौतीस विविध गटांमध्ये होत आहेत.त्यामध्ये चौदा वर्षाखालील बाल व सोळा वर्षाखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी आठ गट तसेच एकोणीस वर्षाखालील ज्युनियर गटामध्ये सात व सीनियर गटामध्ये पाच वजनी गटामध्ये या स्पर्धा होतील.तसेच महिला कुस्तीगिरांसाठी चाळीस,शेहेचाळीस,बावन्न,आठावन्न,पासष्ट व शहात्तर किलो अशा सहा वजनी गटांमध्ये स्पर्धा होतील. शनिवारी(ता.१७) कुमार व महिला.गटातील रविवारी(ता.१८)ज्युनियर व महिला गटातील तर सोमवारी(ता.१९)सर्व गटातील अंतिम फेरीतील कुस्त्या होणार आहेत.