शाहूच्या को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट साठी देशपातळीवरील बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड जाहीर
*७१व्या पुरस्काराने शाहूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*
कागल (प्रतिनिधि) : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या को- जनरेशन पावर प्लांट साठी देश पातळीवर कार्यरत असणाऱ्या को-जनरेशन असोशियशन ऑफ इंडिया या नामांकीत संस्थेचा विशेष श्रेणी वर्गातील सातत्यपूर्ण कामगिरीसाठीचा देश पातळीवरील पुरस्कार आज जाहीर झाला. यापूर्वीही सलग दोन हंगामात सर्वोत्कृष्ट को- जन पाँवर प्लांटसाठीचा पुरस्कार शाहू साखर कारखान्यास मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी म्हणजे हंगाम २०२३-२४ साठी हा पुरस्कार पटकाविण्याचा मान शाहू कारखान्याने पटकावला आहे. पुणे येथे शानदार सोहळ्यात को-जन असोसिएशनचे पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते पुढील महिन्यात या पुरस्काराचे वितरण होईल. को जन असोसिएशनचे महासंचालक संजय खताळ यांनी या पुरस्कार निवडीचे पत्र कारखान्यास पाठवले.
राष्ट्रीय व राज्य पातळीवर एकूण मिळालेल्या पुरस्कारामध्ये कारखान्यास मिळालेला हा ७१वा पुरस्कार आहे.यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील २७ तर राज पातळीवरील ४४ पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे त् शाहू साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच शाहू साखर कारखाना परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
*...हा तर 'शाहू'च्या सभासद शेतकऱ्यांचाच सन्मान-श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे (अध्यक्षा, शाहू साखर कारखाना)*
शाहू कारखाना चालवित असताना पुरस्कारातील सातत्य हा सभासदांच्या सहकार्याची पोच पावती आहे. असे मला वाटते. शाहू कारखान्यास सातत्याने पुरस्कार मिळत असतात पण को-जन असो किंवा डिस्टीलरी या उपपदार्थासाठी ज्यावेळी पुरस्कार मिळतात त्यावेळी कारखान्यासह आपल्या उप-पदार्थ निर्मीती प्रकल्पांचे कामही चांगले चालू आहे हेच सिध्द होते. कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, सभासद शेतकरी यांनी विश्वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ, व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी- कर्मचारी यांच्या कष्टाची जोड याचाच हा परिपाक आहे.