एच.एम.पी.व्ही. व जी.बी.एस. हे आजार रोखण्याकरीता कोणती उपाययोजना केली: आमदार सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न

कोल्हापूर प्रतिनिधी : एचएमपीव्ही आणि जी.बी.एस. हे आजार रोखण्याबाबत आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जी.बी.एस. आणि एच.एम.पी. व्ही. या सारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक' कार्यरत केले असल्याची माहिती दिली
राज्यातील एच.एम.पी.व्ही. आणि जी.बी.एस. हे संसर्गजन्य आजार रोखण्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. भारतासह जागतिक स्तरावर एचएमपीव्हीचा प्रसार झाल्यामुळे विविध देशांमध्ये एच.एम.पी.व्ही.शी संबंधित आजारांचे रुग्ण आढळून आले असून देशातील विविध राज्यांमध्ये या रोगाचे ५ रुग्ण गेल्या जानेवारी महिन्यात आढळले आहेत.
राज्यात विशेषतः पुणे, सोलापूर, नांदेड आणि अन्य जिल्ह्यात गुलियन बँरी सिंड्रोम (जीबीसी) या आजाराने अनेक रुग्ण बाधित झाले असून पुण्यात या आजाराने एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
जीबीएस या आजाराची लक्षणे दूषित पाण्यामुळे वाढत असल्याचा निष्कर्ष आरोग्य तज्ञांनी व्यक्त केला असून, या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली आहे, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विचारला. कोरोना काळात राज्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज नसल्याने अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे पाहता "एचएमपीव्ही" व जी.बी.एस.च्या बाबतीत पुनरावृत्ती होऊ नये याकरीता तसेच सदर आजार रोखण्याबाबत आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे,असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जी.बी.एस. आणि एच.एम.पी. व्ही. या सारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत केले असल्याची माहिती दिली.
त्याचबरोबर बाधित भागातील पाण्याचे नमुने निश्चित केलेल्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून सर्व जिल्ह्यांना पाणी स्वच्छते सह इतरही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याचे सांगितले.