शिक्षण परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन - डॉ.के एच.शिंदे

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी महाविद्यालयाचे व्यासपीठ अत्यंत महत्त्वाचे ठरते. क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, एन.एस.एस. व एन.सी.सी आदी विभाग विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर घालत असतात. योग्य उद्दिष्ट स्वयंशिस्त, आत्मविश्वास स्वयंअध्ययन व शारीरिक तंदुरुस्ती यामुळेच विद्यार्थी आपले ध्येय गाठू शकतो. शिक्षण हे परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे असे प्रतिपादन सावळज येथील श्री रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे यांनी केले.
ते मलकापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ.एन. डी. पाटील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.एन. घोलप हे होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की जिद्द बाळगली तर आयुष्यात काहीही साध्य करता येते. यश प्राप्तीसाठी कष्टाला पर्याय नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध उपक्रमात सहभागी झाल्यास निश्चितच नेतृत्व गुण विकसित होते.
या वेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुहास पाटील व भारत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी गुणवंत प्राध्यापकांच्या यादीचे वाचन प्रा. डॉ. एन. के. कांबळे यांनी केले तर क्रीडा विभागाचा अहवाल शारीरिक शिक्षण संचालक सुवास वाघ यांनी वाचला याबरोबरच संस्कृतिक विभागाचा अहवाल वाचन ग्रंथपाल श्री बी. एस. चिखलीकर यांनी केले.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे औचित्य साधून महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सिद्राम खोत यांची प्रोफेसर पदी निवड झालेबद्दल तसेच शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून व साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला याबरोबरच काव्यसंग्रह प्रकाशित केल्याबद्दल मराठी विभागाचे डॉ.बाळासाहेब सुतार यांचाही सत्कार झाला तसेच डॉ. मकरंद ऐतवडे यांनी पुस्तक लिहिल्याबद्दल तर डॉ.संतोष पोरे यांना पीएच.डी पदवी मिळालेबद्दल सत्कार महाविद्यालयाद्वारे करण्यात आला.
सदरवेळी क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभागात विशेष कार्य केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानपत्र देऊन येथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नामदेव आडनाईक यांनी करून दिला तर सूत्रसंचालन प्रा. प्रमोद नाईक यांनी केले. आभार शारीरिक शिक्षण संचालक सुहास वाघ यांनी मानले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.