संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना एसजीयु आयकॉन पुरस्कार २०२५ जाहीर
![संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना एसजीयु आयकॉन पुरस्कार २०२५ जाहीर](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67addee24c6d3.jpg)
कोल्हापूर प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २८ फेब्रुवारीला कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ''एसजीयु आयकॉन'' हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी कला आणि समाजसेवा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मराठी सिनेमा कलाकार मकरंद अनासपुरे, क्रीडा क्षेत्रातून स्वप्निल कुसळे, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अशोक पुरोहित, प्रसिद्ध ईएनटी सर्जन, शैक्षणिक क्षेत्रात डॉ. अनिल पाटील रयत शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्रात महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण दि.२८ फेब्रुवारी रोजी हिंदी फिल्म स्टार व गायक ‘आयुष्यमान खुराना’ आणि संजय घोडावत यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे या ठिकाणी होणार आहे. अशी घोषणा विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केली यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आयुष्मान खुराना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आयुष्मान खुराना एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता, गायक, निर्माता आणि टेलीविजन होस्ट आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरवात 'पारले जी' च्या विज्ञापनापासून केली होती त्यांना 'आयफा अवॉर्ड्स' आणि 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळवले आहेत. आयुष्मान खुराना यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्य म्हणजे ते नवा विषय आणि सामाजिक संदेश असलेल्या चित्रपटांत काम करतात. त्याचं अभिनय कौशल्य आणि विविधता लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. मकरंद अनासपुरे एक अत्यंत प्रतिभाशाली मराठी अभिनेता आणि नाटककार आहेत. ते विशेषतः मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरील आपल्या अभिनयासाठी ओळखले जातात. मकरंद अनासपुरे यांचे नाम फाउंडेशन अंतर्गत मोठे सामजिक कार्य आहे. क्रीडा क्षेत्रातून स्वप्निल कुसळे यांनी नेमबाजी या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाचे नाव महान केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अशोक पुरोहित प्रसिद्ध ईएनटी सर्जन, पुरोहित हॉस्पिटल, सांगली यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. डॉ. अनिल पाटील रयत शिक्षण संस्था यांचे महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. उद्योग क्षेत्रात महाबळ समूह पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रगत उत्पादन तंत्राचा लाभ देत आहे. या सर्वांचे उल्लेखनीय असामान्य कार्याची दखल घेऊन त्यांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
संजय घोडावत यांचा ६० वा वाढदिवस २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विविध कला, गुणदर्शनाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.