सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची ताकद केपींच्या पाठीशी : पी डी धुंदरे

सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची ताकद केपींच्या पाठीशी : पी डी धुंदरे

राधानगरी (प्रतिनिधी)  : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे जिल्ह्याचे मुख्य नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर सोपविल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली के पी पाटील यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकतीने विधानसभेच्या मैदानात उतरली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व गोकुळ दूध संघाचे संचालक पी डी धुंदरे यांनी केले.

येळवडे (ता.राधानगरी) येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांना के पी यांच्या विजयासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.

ते म्हणाले,"जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदार सतेज पाटील व शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती अशी लढाई होत असून शिवसेनेचे उमेदवार के पी पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे." 

बिद्रीचे संचालक राहुल देसाई म्हणाले,"आम्ही भुदरगड काँग्रेसच्या माध्यमातून के पी पाटील यांच्यासाठी प्रचाराचे रान उठवले असून राधानगरी आणि आजरा तालुक्यातही काँग्रेससह शिवसेना व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकासआघाडी मजबूत आहे. त्यामुळे लागतील तेवढे कष्ट घेऊन यावेळी के पी पाटील यांना विजयी करायचेच असा चंग बांधूया."

शहाजी पाटील यांनी स्वागत व संभाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, विश्वनाथ पाटील,विठ्ठल महाडेश्वर यांची भाषणे झाली.सभेसाठी सदाशिवराव चरापले,हिंदुराव चौगले,धैर्यशील पाटील,संजयसिंह पाटील,प्रा किसन चौगले,कृष्णराव पाटील,पंडितराव केणे,पांडुरंग भांदिगरे,मोहन धंदरे,सुरेश चौगले भगतसिंह नवणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी राधानगरी तालुक्यातील आंबेडकरी विचारांशी संबंधित सर्व पक्ष संघटनांनी के पी पाटील यांना पाठिंबा दिला. सभेपूर्वी राशिवडे खुर्द,पुंगाव,चाफोडी, मोहडे,वाघवडे आदी गावांमध्ये प्रचारदौरा झाला.

 *'बिद्री'प्रमाणेच विधानसभेसाठी मला 'सतेज'बळ* 

माजी आमदार के पी पाटील म्हणाले,"बिद्रीच्या निवडणुकीत जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आसुरी शक्तींच्या विरोधात माझ्या मागे ताकद उभी केली होती. काँग्रेस पक्षात त्यांचा मोठा प्रभाव असून ते स्वतः महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे नेतृत्व करीत असल्याने काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्ते या निवडणुकीत स्वतःला उमेदवार समजून माझा प्रचार करीत आहेत. 'बिद्री'च्या निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत त्यांचे मला बळ मिळाल्याने विजयाची खात्री निर्माण झाली आहे."