सहकारी पाणीपुरवठ्यासाठी सवलतीचे वीजअनुदान पूर्ववत करा ; समरजितसिंह घाटगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सहकारी पाणीपुरवठ्यासाठी सवलतीचे वीजअनुदान पूर्ववत करा ; समरजितसिंह घाटगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कागल (प्रतिनिधी) - सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रति युनिट एक रुपये सोळा पैसे या सवलतीच्या दराप्रमाणे वीज बिले भरण्यासाठी शासनामार्फत महावितरण कंपनीला पूर्ववत अनुदान उपलब्ध करून द्यावे अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिले. मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन घाटगे  यांनी सहकारी संस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे शेतकऱ्यांची कैफियत मांडली. 

शेतकऱ्यांना वैयक्तिक पाणीपुरवठा योजना करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी एकत्रित येत सहकारी पाणी पुरवठा स्थापन केल्या आहेत. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची जिरायत असलेली शेती बागायत होण्यासाठी फायदा झाला आहे. अशा सहकारी संस्थांना प्रति युनिट एक रुपये सोळा पैसे या सवलतीच्या दराने वीज आकारणी केली जात होती. त्यासाठी महावितरणला शासनाकडून अनुदान देण्यात येत होते. त्याची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपली आहे. त्यामुळे महावितरणकडून एक रुपये सोळा पैसे प्रति युनिट या सवलतीच्या दराऐवजी पाच रुपये सत्त्याऐंशी पैसे दराने सर्व पाणीपुरवठा संस्थांना विज बिल आकारणीची बिले दिली आहेत. त्यामुळे ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या या सहकारी पाणीपुरवठा संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्या आहेत. 

राज्यातील कोणत्याही पाणीपुरवठा संस्थांना या वाढीव दराने वीज बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे वीज व इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने आंदोलन छेडून वाढीव दराप्रमाणे आकारलेली वीज बिले भरणा करण्यात येऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र हा यावरील कायमस्वरूपी तोडगा नाही. त्यासाठी या सहकारी पाणीपुरवठा संस्थांना आता शासनाने पूर्वीप्रमाणे मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. तशी मागणी त्यांनी सुद्धा शासनाकडे केली आहे.राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साडे सात अश्व शक्तीपर्यंतची वीज बिले माफ केली आहेत. 

पाणीपुरवठा संस्थांकडील शेतकरी सुद्धा अल्पभूधारक असल्याने याच धर्तीवर पाणीपुरवठा संस्थांना पर्यायाने शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सवलत देण्याची आवश्यकता आहे.यासाठी शासनाने महावितरणला देण्यात येणारे अनुदान पूर्ववत उपलब्ध करून दिल्यास पूर्वीच्या सवलतीच्या दराप्रमाणे पाणीपुरवठा संस्था वीज बिले नियमितपणे भरतील. या अनुदानाची मुदत 2030 पर्यंत करावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे घाटगे यांनी केली.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक - समरजितसिंह घाटगे 

समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कागल व करवीर तालुक्यात पंधरा सहकारी पाणीपुरवठा संस्था आहेत.त्यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली आली आहे. अशीच परिस्थिती केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून जिरायती क्षेत्र बागायती होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. मात्र शासनाकडून देण्यात येणारे अनुदान २०३० पर्यत पुर्ववत  वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्था चालकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी विनंती माझ्याकडे केली होती. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री  महोदय यांची भेट घेतली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर  सकारात्मकता दर्शवली आहे.