सांस्कृतिक दहशतवादाला सडेतोड उत्तर देणारा शाहूग्रंथ - प्रा. प्रकाश नाईक

सांस्कृतिक दहशतवादाला सडेतोड उत्तर देणारा शाहूग्रंथ - प्रा. प्रकाश नाईक

कोतोली (प्रतिनिधि):  "राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके" हा ग्रंथ सध्याच्या सांस्कृतिक दहशतवादाला उत्तर देण्यास उपयुक्त ठरणारा आहे. राजर्षी शाहू महाराज प्रागतिक विचारांचे होते, त्यांच्या विचारांची पॉवर धगधगती ठेवण्याचे काम हा ग्रंथ करीत आहे, असे मत श्री शिव-शाहू महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. प्रकाश नाईक यांनी श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.

कोतोली येथील श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, संशोधन समिती व राजर्षी शाहू अध्यासन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त अर्थायनकार माजी प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित "राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके" या ग्रंथावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना प्रा. प्रकाश नाईक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. जे. के. पवार होते.

यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. प्रकाश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. संस्था सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, संचालक डॉ.अजय चौगुले उपस्थित होते.

राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके या ग्रंथावर प्रा. प्रकाश नाईक यांच्यासह प्रा. डॉ. बी. एन. रावण, डॉ. एस. एस. कुरलीकर, प्रा. पी. डी. माने आदींनी परिक्षणात्मक मनोगते व्यक्त केली.

राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या समाजातील शेवटच्या घटकातील लोकांचा विकास होण्यासाठी आपल्याला लाभलेले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले होते. राजर्षी शाहूंच्या कार्याचे जतन करण्याच्या उद्देशाने डॉ. पवार यांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ पुढच्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एन. रावण यांनी केले.

सामाजिक सलोखा जपण्यासाठी, स्त्री-पुरुष समानतेसाठी आणि जातिव्यवस्था नष्ट करणेसाठी राजर्षी शाहूंनी केलेल्या अलौकिक कार्याचा जागरच या ग्रंथामुळे होत आहे, असे मत डॉ. एस. एस. कुरलीकर यांनी व्यक्त केले.

राजर्षी शाहूंच्या कार्याचा बोलबाला आजच्या लोकशाहीतही मोठ्या प्रमाणात आहे; हे अधोरेखित करण्याचे कार्य या ग्रंथाच्या माध्यमातून होत आहे, असे मत प्रा. पी. डी. माने यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले तर पाहुण्यांची ओळख डॉ. उमा पाटील यांनी करुन दिली. आभार डॉ. यु. एन. लाड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. एम. के. कांबळे यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.