शेती गोदाम बांधकाम बाबींसाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत

शेती  गोदाम बांधकाम बाबींसाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर प्रतिनिधी  : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत, स्थानिक पुढाकाराच्या बाबींतंर्गत, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) करिता गोदाम बांधकाम (250 मे.टन क्षमता) या बाबीचा भौतिक- 2 संख्या व आर्थिक रक्कम 25 लाख रुपये इतका लक्षांक कोल्हापूर जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) यांनी आपले अर्ज 31 जुलै 2024 पूर्वी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्यामार्फत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी यांनी केले आहे.

लाभार्थी निवड ऑगस्ट 2024 मध्ये होईल. लक्षांकाच्या तुलनेत अर्ज जास्त आल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल.अन्नधान्य पिके, कडधान्य पिके घेतली जातात तथापि गोदामाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा रक्कम 12.50 लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. ही बाब बँक कर्जाशी निगडीत आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी या बाबीच्या लाभास पात्र राहील. गोदाम बांधकामाचे मंजूर लक्षांक व मार्गदर्शक सुचनेनुसार अंमलबजावणी करण्यात येईल, तांत्रिक माहितीसाठी आपण आपल्या तालुक्यातील कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.