कोरे अभियांत्रिकीचे प्रा. बोरचाटे यांना आयआयटी कानपूर कडून पी.एच.डी. पदवी प्रदान
वारणानगर (प्रतिनिधि) : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक सौरभ शिवाजी बोरचाटे यांना भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) कानपुर कडून पी.एच.डी. पदवी प्रदान झाली आहे.
प्रा. बोरचाटे हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अनुभवी प्राध्यापक असून, त्यांनी "एरोस्पेस इंजिनिअरिंग - स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल डायनामिक्स अँड एरोईलास्टीसिटी" या विभागात संशोधनपर प्रबंध सादर केला. प्रा. बोरचाटे यांना डिसेंबर 2017 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालय (MHRD), भारत सरकार व आयआयटी कानपुर कडून संशोधन फेलोशिप पाच वर्षे करीता प्राप्त झाली होती. या संशोधनासाठी त्यांना प्राध्यापक डॉ. पी. एम. मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्जींनी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला डॉ. विनयरावजी कोरे यांनी दिला. डीन, डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने व विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.