सीमा हैदर तूर्तास राहणार भारतातच ; पाकिस्तानात पाठवल्या जाणाऱ्या यादीत नाव नाही

सीमा हैदर तूर्तास राहणार भारतातच ; पाकिस्तानात पाठवल्या जाणाऱ्या यादीत नाव नाही

उत्तर प्रदेश : आपल्या चार मुलांसहीत पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेली आणि उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या सचिन मीणाशी लग्न केलेली बहुचर्चित सीमा हैदर पाकिस्तानात परत गेली नाही. तुर्तास तीला भारतातच आश्रय मिळाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने भारतात पाकिस्तानच्या व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे. दिर्घ आणि कमी मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात परत पाठवण्यात येत आहे. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या सीमा हैदरचे नाव पाकिस्तानात पाठवल्या जाणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट नाही.

नोएडा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीमा हैदरबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही विशिष्ट आदेश मिळालेला नाही. आदेश मिळताच सीमाबाबतीत पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सीमावर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याबद्दल उत्तर प्रदेश न्यायालयात खटला प्रलंबित आहे. आता न्यायालय निर्णय देईपर्यंत सीमा इथेच राहील. सीमाला भारतीय नागरिकत्व मिळावे या मागणीबाबत राष्ट्रपती भवनातही सीमाप्रश्न प्रलंबित आहे. राष्ट्रपती भवनाकडून अद्यापही त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सीमाला भारतीय नागरिकत्व देण्यासाठीचा हा अर्ज पहलगाम हल्ल्याच्या खूप आधी करण्यात आला होता. राष्ट्रपती भवनातून हा निर्णय येत नाही तोपर्यंत सीमाला भारतातून पाकिस्तानला परत पाठवता येणार नाही. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर, जेव्हा पाकिस्तानी लोकांना भारतातून हाकलून देण्याची बातमी आली, तेव्हा सीमाने एक व्हिडिओ जारी केला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना आवाहन केले की तिला पाकिस्तानात पाठवू नये कारण आता ती भारताची सून आहे. सीमाने मे २०२३ मध्ये नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला.