अबू आझमींना अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. सत्ताधाऱ्यांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंत्री चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत मांडला. त्यानुसार आझमींना अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्याचा ठराव विधानसभेत प्रचंड गदरोळात मंजूर करण्यात आला.
अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे काम काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच भाजप आमदार महेश लांडगे यांनी अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या उद्दातीकरण केल्याचा मुद्दा उपस्थित केला. लांडगे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. या मागणीस सत्ताधारी आमदारांनी पाठिंबा दिला.
‘देशद्रोहाबाबत चर्चा करणार’
‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमी यांचा आम्ही निषेध करतो. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
उबाठाचे आमदार आक्रमक
शिंदे भूमिका मांडायला सुरू करतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. ‘केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. मग आझमींवर का कारवाई केली जात नाही, तुम्ही ही सर्व नाटकबाजी करत आहात, तुम्हाला केवळ विद्वेष पसरवायचा आहे. भांडणे लावायची आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर आझमींना निलंबित करा,’ असे आव्हान भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.