दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ..?

सातारा - सध्या राजकीय वर्तुळात एकच मुद्दा जास्त चर्चेत आहे आणि तो म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांच्या एकत्र येण्याची शक्यता. याबाबत स्वतः शरद पवार यांनीच वक्तव्य करत सांगितले की, त्यांच्या पक्षात अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा विचार करणारा एक गट आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
शरद पवार यांनी हेही स्पष्ट केलं की, केंद्रातील विरोधी पक्षात बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. दोन्ही गट एकत्र यावेत का, याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी मिळून घ्यावा, असंही त्यांनी सुचवलं. “दोनही पक्षांची विचारधारा सारखी असल्यामुळे भविष्यात एकत्र आले तरी मला आश्चर्य वाटणार नाही,” असंही पवार म्हणाले.
या विधानावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी संयम राखलेला सूर ठेवला. त्या म्हणाल्या, “मी अजून हे वक्तव्य वाचलेले नाही. काल मी दिल्लीत होती, ऑल पार्टी मिटिंग आणि नवीन इनकम टॅक्स कायद्यावर चर्चा होती. त्यामुळे मी या घडामोडींमध्ये सहभागी नव्हते. सर्व माहिती मिळाल्यावरच प्रतिक्रिया देईन.”
शरद पवार आणि अजित पवार एकत्र कार्यक्रमात दिसत असल्याच्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रात नेत्यांच्या भेटीगाठी होतच असतात. पण पवार साहेबांनी नेमकं काय, कुठे, कशा संदर्भात बोललं, हे समजल्याशिवाय मी काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. संघटनेत जबाबदारीने आणि विचारपूर्वक बोलणं गरजेचं असतं.”
इंडिया आघाडीबाबत विचारल्यावर सुळे म्हणाल्या, “सध्या आम्ही संसदेत समन्वयाने काम करत आहोत. आमचं लक्ष्य सध्याच्या घडामोडींमध्ये राजकारण न करता जबाबदारीने काम करणं आहे. भारत सरकारच्या निर्णयांबाबत आम्ही जबाबदार भारतीय म्हणून त्यांच्यासोबत आहोत.” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.