अर्थसंकल्पावरून राज्यसभेत गदारोळ;घोषणाबाजी करत विरोधकांचा सभा त्याग!

अर्थसंकल्पावरून राज्यसभेत गदारोळ;घोषणाबाजी करत विरोधकांचा सभा त्याग!

दिल्ली (प्रतिनिधी) :मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (२३ जुलै) लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर आता लोकसभा व राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील खासदार अर्थसंकल्पावरील आपापली मतं मांडत आहेत. 

लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला लोकसभेच्या अध्यक्षांकडून (ओम बिर्ला) सभागृहात ४ तास बोलण्याची परवानगी मिळाली आहे. लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक झालेले असताना राज्यसभेतही काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर भेदभावाचे आरोप केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी देखील प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला. परिणामी, विरोधी पक्षांमधील खासदार सभागृहातून बाहेर पडले.

दोन्ही सभागृहातील खासदारांनी संसदेच्या बाहेर जाऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एका बाजूला विरोधक आक्रमक झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकारच्या पुढील रणनीतीवर चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे.