डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची 4० वर्षाची वाटचाल प्रेरणादायी- डॉ. संजय डी. पाटील
कसबा बावडा (प्रतिनिधी) : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी 1984 मध्ये सुरू केलेल्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४० वर्षांची वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे पहिले महाविद्यालय असलेल्या या संस्थेने प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठले आहेत. यापुढेही अधिक चांगल्या सुविधा व अत्यधुनिक अभ्यसक्रमासह उत्तम अभियंते घडवण्याचे कार्य महाविद्यालयामार्फत अखंडीतपणे सुरु राहील अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांनी दिली.
कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या 41 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील, सौ शांतादेवी डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. डी वाय पाटील यांच्या हस्ते केक कापून ४१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, १९८४ रोजी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कसबा बावडा येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात केली होती. वयाच्या २४ व्या वर्षी आपल्याकडे महाविद्यालयाची जबाबदारी दिली. केवळ २४८ विद्यार्थ्यांसह सुरु झालेल्या या महाविद्यालयात आज ४,५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डी वाय पाटील यांच्या नावाने आज आठ विद्यापीठे राज्यभर कार्यरत आहेत. एकाच व्यक्तीच्या नावाने एवढ्या मोठ्या संख्येने विद्यापीठ असणारा हा एकमेव ग्रुप असल्याचा आपल्याला अभिमान आहे.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, २०१६ मध्ये आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे आपण हि जबाबदारी सोपवली. त्यांच्या नेतृत्वाखाली आज महाविद्यालयाचा चौफेर विकास सुरु आहे. ‘नॅक’ श्रेणी, एनबीए मानांकन, शिवाजी विद्यापीठाची कायम सलग्नता व युजीसी नवी दिल्लीकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा महाविद्यालयाला मिळाला आहे. आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाला स्वायत्त संस्थेच्या अभ्यासक्रमाचा दर्जा मिळवणारे हे राज्यातील पहिले महाविद्यालय आहे. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनीही महाविद्यालयाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. सर्वाधिक प्रवेश क्षमता असलेले हे राज्यातील चौथ्या क्रमांकाचे महाविद्यालय ठरले आहे. हजारो विद्यार्थी आज उत्तम अभियंते म्हणून देश विदेशात नाव कमावत आहेत. शेकडो आर्कीटेक्ट देशाच्या विकास व निर्माण प्रक्रियेत योगदान देत आहेत. हे सर्व यश पाहिल्यानंतर आपल्याला अतिशय समाधान वाटत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गरजा व संधी लक्षात घेऊन नवनवीन अभ्यासक्रम, अत्याधुनिक सुविधा देण्यावर आम्ही नेहमीच भर दिला आहे. गतवर्षी महाविद्याल्याच्या ९८% जागा भरल्या याचा अभिमान वाटतो. विद्यार्थ्याना चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून विशेष प्रयत्न केले जातात. यावर्षी तब्बल ६५० विद्यार्थ्यांना विविध कंपन्यामध्ये प्लेसमेंट मिळाली आहे. आमचे २४९ विद्यार्थी आयआयटी मुंबई मध्ये इंटर्नशिप करत असून १३६ विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात पेड इंटर्नशिप करत आहेत.
संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, डॉ. संजय पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक नव्या योजना, विविधांगी उपक्रम राबवले जात आहेत. व्यावसायिक शिक्षण देणारी सर्वोत्तम संस्था अशी आज महाविद्यालयाची ओळख आहे. विविध परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, सोफट स्कील ट्रेनिंग विद्यार्थ्याना दिली जातात. विविध कार्यशला. ऑनलाईन ट्रेनिंग, विविध कंपन्यांशी सामंजस्य करार या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधन आणि करिअरच्या उत्तम संधी या ठिकाणी उपलबद्ध करून दिल्या जात आहेत. भविष्यात देशांतील अग्रगण्य महाविद्यालय बनविण्यासाठी सर्व सहकारी मेहनत घेतील.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू राकेश कुमार मुदगल, डी वाय पाटील पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल डॉ. महादेव नरके, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉक्टर सुनील रायकर, यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. एल व्ही मालदे, प्रा. रवींद्र बेन्नी यांच्यासह डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राधिका ढणाल व प्रा. मधुगंधा मिठारी यांनी केले तर आभार डॉ. संतोष चेडे यानी मानले.