शिंगणापूर विद्यानिकेतनमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रस्ताव
कोल्हापूर (प्रतिनिधि) : जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर (ता. करवीर) येथील राजर्षी शाहू विद्यानिकेतन येथे अकरावी व बारावीपर्यंत कला आणि वाणिज्य शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्याकडे मंजुरीसाठी दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिलेल्या प्रस्तावात शिंणापूर येथे सध्या पाचवी ते दहावीपर्यंतचे ४०१ विद्यार्थी संख्या आहे. तर दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८६ इतकी आहे. याशिवाय राजर्षी शाहू विद्यानिकेतनपासून हणमंतवाडी हायस्कूल, हणमंतवाडी, फुलेवाडी येथील महात्मा फुले हायस्कूल तसेच गुरुदेव विद्यानिकेतन अशा माध्यमिक शाळा असल्याचे नमूद केले आहे. या शाळेत वर्गवार खोल्या, स्वतंत्र प्रयोगशाळा व आवश्यक सर्व साहित्य आहे. जिल्हा परिषदेकडे सध्या ९ हजार ७८१ पायाभूत पदे मंजूर आहेत. २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार ८ हजार ४५६ पदे मंजूर आहेत. जिल्हा परिषदेकडे सध्या १३२५ पायाभूत पदे शिल्लक असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे २०२४-२५ पासून शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन येथे अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा प्रस्ताव दिला आहे.
*शिंगणापूर येथील विद्यानिकेतनमध्ये अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. याठिकाणी कला आणि वाणिज्य शाखा सुरू करण्याचा हा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठवला आहे.
- मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हापरिषद*