अशोकराव माने इन्स्टिट्यूटतर्फे मतदान जागरूकता रॅली

अशोकराव माने इन्स्टिट्यूटतर्फे मतदान जागरूकता रॅली

वाठार तर्फ वडगाव प्रतिनिधी : श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सतर्फे मतदान जागरूकता अभियानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, मतदान करण्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने महाविद्यालयाने पेठवडगाव शहर परिसरामध्ये मतदान जागरूकता रॅलीचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली.

पेठवडगाव मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी हातकणंगले येथील स्वीप नोडल ऑफिसर जगन्नाथ पाटील व भादोले येथील क्लस्टर प्रमुख निवृत्ती पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

विद्यार्थी- विद्यार्थिनींनी घोषणा देत पेठवडगाव परिसरातील नागरिकांना मतदान करण्याबाबतचे आवाहन केले. तसेच रॅलीसोबत याविषयी आवाहन करणारे १५०० पत्रकांचेही वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्रथम वर्ष व कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मतदान जनजागृती अभियान राबविण्यासाठी निवडणूक साक्षरता मंचचे समन्वयक डॉ. जे. एम. शिंदे, सोशल क्लबचे समन्वयक डॉ. दिग्विजय पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. संग्राम दोपारे, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. अमोल सूर्यवंशी आदींचे सहकार्य लाभले. तसेच प्रथम वर्ष विभागातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी रॅलीमध्ये सहभाग होते.