आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. क्रीडा संकुलाला भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलाच्या विकासासाठी नामवंत सल्लागारांची नेमणूक करून प्रस्तावित आराखडा तयार करून तो शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले.
पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, क्रीडा संकुलातील सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या क्रीडा सुविधांचा खेळाडूंना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, यासाठी योग्य नियोजन आणि कार्यपद्धती तयार करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कोल्हापूर विभागातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दर्जेदार मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला.
पालकमंत्र्यांनी क्रीडा संकुलात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, रायफल शूटींग, इनडोअर गेम्स आणि जिम यासारख्या सुविधा कोल्हापूरकरांना उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर नियोजन करण्याचे निर्देश दिले. या सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात, यासाठी क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करून सर्वसमावेशक आराखडा तयार करा आणि तो शासनाला सादर करा, असे ते म्हणाले. यामुळे कोल्हापूरातील खेळाडूंना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री आबिटकर यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यात कोणतीही तडजोड न करता उच्च दर्जा राखण्याचे निर्देश दिले. वेळेत कामे पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. यामुळे खेळाडूंना लवकरात लवकर या सुविधांचा लाभ घेता येईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, क्रीडा संकुलाचा वापर वाढवण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यावर त्यांनी भर दिला.
या भेटीवेळी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.