कोल्हापूरात 21 व 22 सप्टेंबरला निसर्गोत्सव
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक सेंद्रिय दिनाचे औचित्य साधून सेंद्रिय शेती व उत्पादनांबाबत जनजागृती करण्यासाठी कोल्हापूरात 21 व 22 सप्टेंबर रोजी "निसर्गोत्सव" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्र आणि तज्ञांचे मार्गदर्शन यासह विविध उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री असे याचे स्वरुप असल्याची माहिती आयोजक इकोस्वास्थ्यचे डॉ. दिलीप माळी, किर्लोस्कर वसुंधराचे शरद आजगेकर आणि प्रसारमाध्यमचे प्रताप पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात अधिकाधिक उत्त्पन्न घेण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे आणि यामुळेच जैवविविधता, जमिनीची सुपीकता आणि पर्यायाने मानवी आरोग्यालाही धोका पोहचत आहे. यावर रामबाण उपाय म्हणजे सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जागृती व्हावी हा "निसर्गोत्सव" चा मुख्य उद्देश आहे. राजारामपुरी आठव्या गल्लीतील भारत हौसिंग सोसायटीच्या सभागृहात सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती उत्पादनांचे स्टॉल लावले जाणार असून देशी वाणांची बी-बियाणे आणि रोपांची विक्री केली जाणार आहे. सेंद्रिय भाजीपाला, रानभाज्या, कंदमुळे आणि खाद्यपदार्थही उपलब्ध असणार आहेत. टेरेस गार्डन, सेंद्रिय शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले जणार आहे. शिवाय प्रत्येकाच्या घरातील ओला आणि सुका कचरा टाकून देण्याऐवजी त्याचे कंपोस्ट खत तयार करता येते. त्याद्वारे आरोग्यदायी भाजीपाल्याचे उत्पादन टेरेस गार्डन अथवा घरच्या बाल्कनीत किंवा बंगल्याशेजारील रिकाम्या जागेतही घेवू शकतो. याचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकही यावेळी दाखवले जाणार आहे. तिरुपती क्रेन सर्व्हिस हे या अभिनव उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.