हिंदी सक्तीवर अभिनेता अजय देवगणने प्रसिद्ध डायलॉग म्हणत दिली प्रतिक्रिया...

हिंदी सक्तीवर अभिनेता अजय देवगणने प्रसिद्ध डायलॉग म्हणत दिली प्रतिक्रिया...

मुंबई - राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिसूत्री भाषा धोरण लागू केल्यानंतर तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध झाला असून, मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करत ठाकरे बंधूंनीही एकत्र येत नाराजी व्यक्त केली आहे. मनसेने अमराठी लोकांच्या दादागिरीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने हा मुद्दा आणखी तापला आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता अजय देवगणने 'सन ऑफ सरदार 2' च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात भाष्य करताना आपल्या 'सिंघम' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हणत म्हणाला, "आता माझी सटकली..." असं म्हणत आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. मात्र, त्याने या वादावर थेट मत नोंदवलं नाही. त्यामुळे अजय देवगण नक्की कुणाच्या बाजूने आहे, हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.

वादाची सुरुवात एप्रिलमध्ये झाली, जेव्हा महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केलं. हा निर्णय केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाअंतर्गत घेण्यात आला असून, विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठीसोबत हिंदी शिकणं बंधनकारक केलं आहे. दरम्यान, या विषयावर अनेक सेलिब्रिटींनी आपली मतं व्यक्त केली आहेत. प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी भाषिक विविधतेला समर्थन देत सांगितलं, “महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे, त्यामुळे मराठी भाषेचा आदर होणं आवश्यक आहे. मात्र, देशातील सर्व भाषांना समान सन्मान मिळायला हवा.”

गायक-अभिनेता अनुप जलोटा यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली. “हिंदी ही आपल्या देशाची मातृभाषा असली तरी प्रत्येक प्रादेशिक भाषेचं महत्त्वही तितकंच आहे. मी स्वतः मराठीत गातो. आपल्याला जितक्या भाषा येतील, तितकं चांगलं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सरकारी शाळांमध्ये हिंदीची सक्ती करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही.

अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार 2’ हा चित्रपट 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, यात मृणाल ठाकूर, नीरू बाजवा आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.