ईएसआय हॉस्पिटलच्या सक्षमीकरणासाठी सरकारने कोणती विशेष योजना आखली आहे का? : खा. धनंजय महाडिक

ईएसआय हॉस्पिटलच्या सक्षमीकरणासाठी सरकारने कोणती विशेष योजना आखली आहे का? : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

ईएसआय हॉस्पिटलच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने कोणती विशेष योजना आखली आहे का? असा प्रश्न खासदार महाडिक यांनी आज संसदेच्या अधिवेशनात उपस्थित केली.  कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज अधिवेशनात कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. बहुतेक प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या वतीने ईएसआय हॉस्पिटल चालवले जाते. कष्टकरी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य रक्षणासाठी आणि औषध उपचारासाठी ईएसआय हॉस्पिटल महत्त्वाची भूमिका बजावते. 2018 मध्ये कोल्हापुरातही ईएसआय हॉस्पिटल सुरू झाले. मात्र हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू नाही. पायाभूत सुविधांसह डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. कोल्हापुरातील ईएसआय हॉस्पिटल सुमारे पंधरा वर्षे बंद होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षापासून हे हॉस्पिटल सुरू झाले असले, तरी पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. त्यामुळे अशा हॉस्पिटलच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने कोणती विशेष योजना आखली आहे का? अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली. 

महाराष्ट्रात अन्य कोणत्या ठिकाणी ईएसआय हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे का? याबाबतही खासदार महाडिक यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. खासदार महाडिक यांच्या प्रश्नावर, केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी केंद्र सरकारकडून दोन प्रकारे ईएसआय हॉस्पिटलचे परिचालन केले जात असल्याची माहिती दिली. राज्य सरकार आणि महापालिकेसारखी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत देशभरात ईएसआय हॉस्पिटल चालवली जातात. ही सर्व हॉस्पिटल अधिक क्षमतेने आणि परिपूर्ण पद्धतीने चालावीत, यासाठी केंद्र सरकार आवर्जून लक्ष देईल, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूरचे ईएसआय हॉस्पिटल लवकरच कात टाकून गतिमान रुग्णसेवेसाठी सज्ज होईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.