विद्यापीठांच्या सशक्तीकरणाबाबत राज्य शासन गंभीर: मंत्री चंद्रकांतदादा पाटील

विद्यापीठांच्या सशक्तीकरणाबाबत राज्य शासन गंभीर: मंत्री चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांची पूर्तता करून त्यांचे सशक्तीकरण करण्याबाबत राज्य शासन गांभीर्याने काम करीत आहे, असे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम परिसरांना कायमस्वरुपी जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उद्घाटन आज मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.

मंत्री  पाटील म्हणाले, विद्यापीठांना पायाभूत सुविधा पुरवून त्या अनुषंगाने त्यांचे सक्षमीकरण जितके आवश्यक आहे, तितकेच त्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यापीठांनी देशविदेशांतील विविध विषयांतील तज्ज्ञ प्राध्यापकांना ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस’ म्हणून आमंत्रित करून त्यांच्याकडील ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. शिवाजी विद्यापीठाने विविध परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करार केले आहेत, ही चांगली बाब आहे. पुढील काळात याचे प्रमाण वृद्धिंगत करावे, असेही त्यांनी सांगितले.

‘‘कमवा व शिका’ योजनेचे सशक्तीकरण करावे’

यावेळी मंत्री पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या ‘कमवा व शिका’ योजनेचे अधिक सशक्तीकरण करावे, अशी सूचना केली. ते म्हणाले, सध्या या योजनेअंतर्गत काम करीत असणाऱ्या विद्यार्थिनींचे कामाचे तास आणि त्यासाठी त्यांना देण्यात येणारे शुल्कही वाढवावे. यासाठी काही खाजगी उद्योगांकडून सामाजिक दायित्व निधी मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू, जेणे करून योजनेतून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त साधारण अडीच हजार रुपयांचा अधिकचा निधी संबंधित विद्यार्थिनींना मिळून त्यांचे सक्षमीकरण होईल, असे ते म्हणाले.

‘सिंधी, गुजराती, राजस्थानी भाषा अभ्यासक्रमांसाठी प्रस्ताव द्या’

मंत्री  पाटील म्हणाले, कोल्हापूर परिसरात सिंधी, गुजराती, राजस्थानी बांधवही कामानिमित्ताने स्थायिक झाले आहेत. आपण मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरीत असताना त्यांनाही त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याचा हक्क प्रदान केला पाहिजे. त्या दृष्टीने सुरवातीला या भाषांतील ३ महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करावेत, जेणे करून या बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मातृभाषा शिक्षण घेता येऊ शकेल. शिवाजी विद्यापीठाने या भाषांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने तसा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांना केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, राष्ट्रीय येवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, राहुल चिकोडे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. व्ही.एम. पाटील, स्वागत परुळेकर यांच्यासह बांधकाम समितीचे सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.