उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आलेल्या धमकीमागे बुलढाणा कनेक्शन ; दोघांना घेतले ताब्यात

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वाहनाला बॅाम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली होती. गोरेगाव पोलिसांना ईमेलद्वारे ही धमकी पाठवण्यात आली. हैराण करणारे म्हणजे मुंबईतल्या जवळपास 3 ते 4 पोलीस ठाणे आणि इतर विभागात धमकीचा मेल आला होता. आता मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा पोलिसांच्या मदतीने बुलढाणा येथून दोन जणांना ताब्यात घेतले. या दोघांनी जे. जे मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे आणि मंत्रालय या ठिकाणी इमेल करून धमकी दिली होती.
अभय शिंगणे (वय 22), मंगेश वायाळ (वय 35) अशी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वाहनाला बॅाम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या आरोपींची नावे आहेत. अभय शिंगणे हा टेक्निशियन आहे तर मंगेश हा चालक आहे. दोघांनी मिळूनच धमक्या दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना ताब्यात घेतले आणि आता त्यांची चाैकशी केली जात आहे. या दोघांनी धमकी नेमकी का दिली आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा तपास पोलिस करत आहेत.