'मला संधी द्या, खूनाचा बदला खूनाने घेईन': आ. संतोष बांगर

'मला संधी द्या, खूनाचा बदला खूनाने घेईन': आ. संतोष बांगर

हिंगोली : आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी "मला संधी द्या, खूनाचा बदला खूनाने घेईन" अशी मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा अतिरेक्यांवर थेट गोळीबार करण्याची मागणी केली.

बांगर म्हणाले की, भारतात राहून पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांनाही देशात राहण्याचा अधिकार नाही. तेही दहशतवादीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, "दहशतवादाला धर्म नसतो, पण का बरे बहुतांश दहशतवादी एका विशिष्ट धर्माचेच असतात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, "आम्हालाही तलवार, लाठ्या-काठ्या चालवता येतात, पण आम्ही त्या विधायक कामांसाठी वापरतो. मात्र जर देशविघातक कृती घडल्या आणि त्यांना काही लोकांनी खतपाणी घातले, तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल."

सततच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बांगर म्हणाले की, "मी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी बोलतो. त्यामुळे माझा आक्रमकपणा मी सोडणार नाही. मी आधी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, आमदार नंतर." ते म्हणाले की, प्रखर हिंदुत्व आणि आक्रमक भूमिकेमुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.