ऑपरेशन सिंदूरचे मोठे यश : आयसी - ८१४ अपहरणाचा सूत्रधार रौफ अझहर ठार

ऑपरेशन सिंदूरचे मोठे यश : आयसी - ८१४ अपहरणाचा सूत्रधार रौफ अझहर ठार

इस्लामाबाद - ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केल्यानंतर भारताला मोठे यश मिळाले आहे. १९९९ मधील आयसी - ८१४ एअर इंडियाच्या विमान अपहरण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी रौफ अझहर एका हल्ल्यात ठार झाला आहे. बुधवारी, ऑपरेशन सिंदूरमध्ये जखमी झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात तो दिसून आला होता. 

भारताने स्पष्ट केले होते की, देशाविरोधातील दहशतवाद्यांना त्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानी जाऊन ठार करण्यात येईल. रौफ अझहरचा मृत्यू हे त्याचे ठोस उदाहरण मानले जात आहे. यापूर्वी उरी आणि पुलवामा हल्ल्यांनंतर भारताने हवाई कारवाया करून आपली कारवाईक्षमता दाखवली होती. आता मसूद अझहरचाही अंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या ऑपरेशनदरम्यान पाकिस्तानमधील बहावलपूर येथे जैश - ए - मोहम्मदच्या मुख्यालयावर झालेल्या हवाई हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला. मसूद अझहरही गंभीर जखमी झाल्याचे समजते, जरी तो काल प्रार्थनेत दिसून आला होता. आता रौफ अझहरचा मृत्यू झाल्याने दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.

रौफ अझहर हे जागतिक पातळीवर घोषित दहशतवादी होते आणि संयुक्त राष्ट्रांच्या १२६७ ठरावांतर्गत त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले होते. भारतावर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता, आणि तो बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या लाँच पॅडवर सक्रिय होता. या कारवाईनंतर जागतिक पातळीवर भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.