कागलमध्ये पिलरच्या पुलाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समरजितसिंह घाटगे यांनी मानले आभार

कागलमध्ये पिलरच्या पुलाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समरजितसिंह घाटगे यांनी मानले आभार

कागल (प्रतिनिधी) - कागल येथे पिलरचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आभार मानले.

कागलमध्ये होणारा उड्डाणपूल हा भराव टाकून न करता कराडच्या धर्तीवर पिलरचा व्हावा, अशी मागणी याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्याकडे  घाटगे यांनी प्रत्यक्ष भेटून  केली होती. त्यानंतर मंत्री गडकरी यांच्या सूचनेनुसार  कागलमध्ये सेवानिवृत्त अधिकारी आर. के. पांडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पाहणी करुन नागरिकांच्या सूचना ऐकल्या होत्या. पूर्वी दिलेल्या भराव टाकून करावयाच्या उड्डाण पुलाचे टेंडर रद्द करून कराडच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या फ्लायओव्हरचे टेंडर या कमिटीच्या शिफारशीनुसार प्रस्तावामध्ये समाविष्ट करावे.अशीही आग्रही मागणी घाटगे यांनी केली होती. त्यास गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या पिलरच्या उड्डाण पुलास मंजुरी दिली. त्यामुळे शहरात ये - जा करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. वाहतूक सुलभपणे होणार आहे. शहराच्या विकासास चालना मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती मंत्री गडकरी यांना घाटगे यांनी दिली. यावेळी उभयंतामध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

विस्थापित नागरिकांच्या मागण्यांबाबतही सकारात्मक चर्चा - 

यावेळी या उड्डाण पुलामुळे विस्थापित होणाऱ्या  नागरिकांच्या मागण्यांबाबतही मंत्री गडकरी यांच्याशी घाटगे यांची सकारात्मक चर्चा झाली. प्रस्तावित उड्डाणपूल परिसरातील  जागेची नुकसान भरपाई बाजार भावानुसार वाढीव दराने मिळावी, रुंदीकरणात दोन मीटरची सवलत मिळावी, यासह विस्थापित नागरिकांच्या अन्य मागण्यांबाबत मंत्री गडकरी यांच्याशी घाटगे यांनी सविस्तर चर्चा केली. याबाबतही संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढूअसे मंत्री गडकरी यांनी सांगितल्याची माहिती घाटगे यांनी दिली.