निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्याकरीता 19 ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजावण्याकरीता मतदार यादीत आपले नाव असणे आवश्यक आहे. या निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या मतदार यादीत नाव येण्यासाठी नमुना अर्ज क्र. ६ च्या अर्जाव्दारे नोंदणी करण्याचा शेवटचा दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरीकांनी 'मतदाता सेवा पोर्टल' https://voters. eci.gov.in/ आणि 'वोटर हेल्पलाइन अॅप' (Voter Helpline APP) यावर ऑनलाइन सुविधाचा वापर करुन १९ ऑक्टोबर पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. तसेच इतर सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री वोटर हेल्पलाइन अॅपवर करून नाव नसल्यास त्यांनीही १९ ऑक्टोबर पर्यंत नमुना अर्ज क्र. ६ च्या अर्जाव्दारे नोंदणी करावी.
राज्यात विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी अगोदरच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला आहे.