किफायतशीर कार्बनशोषक तंत्रज्ञान विकासाची गरज: मेजर जनरल डॉ. श्री पाल

किफायतशीर कार्बनशोषक तंत्रज्ञान विकासाची गरज: मेजर जनरल डॉ. श्री पाल

कोल्हापूर : पर्यावरणातील कार्बनचे उत्सर्जन रोखणे ही आजची महत्त्वाची गरज आहेच, पण त्याचबरोबर वातावरणातील कार्बन थेट शोषून घेणारे किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने संशोधनाची दिशा केंद्रित करणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन विशिष्ट सेवा पदक पुरस्कृत मेजर जनरल डॉ. श्री पाल यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग, पर्यावरणशास्त्र अधिविभाग, हवामान बदल व शाश्वतता अभ्यास केंद्र, भूगोल अधिविभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ हौसिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स (ISHRAE- इशरे) संस्थेचा कोल्हापूर चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सृष्टी संजीवन’ या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेस आज प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बीजभाषण करताना डॉ. पाल बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर इशरे- कोल्हापूरचे प्रेसिडेंट प्रमोद पुंगावकर प्रमुख उपस्थित होते.

मेजय जनरल डॉ. श्री पाल यांनी आपल्या व्याख्यानात पर्यावरणासह मानवी जीवनावर झालेले आणि होऊ शकणाऱ्या कार्बनच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर विवेचन केले. मानवजातीच्याच नव्हे, तर एकूणच पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि संतुलित राखणे अत्यावश्यक असल्याचे सांगताना ते म्हणाले, सन १००० ते १८०० या प्रदीर् कालावधीमध्ये वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण स्थिर होते. व्यक्तीगत पातळीवर श्वासोच्छवासातूनही आपण हे उत्सर्जन करीत असतो. पण पूर्वी झाडे, वनस्पतींच्या मुबलक अस्तित्वामुळे ते संतुलित राखले गेले. त्यानंतरच्या काळात गतीने वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे आणि त्यासाठी वनसंपदेच्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या कत्तलींमुळे हे कार्बनचे प्रमाण प्रचंड गतीने वाढले. हे प्रदूषण रोखणे आवाक्यापलिकडचे वाटत असले तरी मानवासह जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी ते आपल्याला करावे लागेल. त्याच बरोबरीने कार्बन डायऑक्साईड हवेतून थेट शोषून घेणारे तंत्रज्ञानही मोठ्या प्रमाणात विकसित करण्याची आवश्यकता आहे. हवेच्या त्वरित शुद्धीकरणासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे. यावेळी डॉ. पाल यांनी अत्याधुनिक बंकर तंत्रज्ञान विकास आणि उभारणी याकामी बजावलेल्या कामगिरीविषयीही माहिती दिली. त्यामध्ये अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपला प्रयोग सफल झाल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र ही भारतीय अणूतंत्रज्ञानाची जनकभूमी असल्याचा आदरपूर्ण उल्लेखही त्यांनी केला.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, काळाची पावले आणि गरजा ओळखून शाश्वत नवतंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. समाजाला घातक पर्यावरणीय दुष्परिणामांपासून वाचविण्यासाठी इशरेने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा असून त्यांच्या विविध उपक्रमांशी शैक्षणिक व संशोधकीय माध्यमातून विद्यापीठ जोडले जाण्याचा आनंद वाटतो. उद्योग आणि औद्योगिक संस्थांचे अशा सहकार्यासाठी पुढे येणे हे सकारात्मक लक्षण आहे. समाजाला अशा गोष्टींबाबत अवगत करीत राहणे ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आहे.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या डिजीटल स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. ए.बी. कोळेकर यांनी स्वागत केले. समन्वयक डॉ. पुनश्री फडणीस यांनी प्रास्ताविक केले. इशरेचे प्रेसिडेंट प्रमोद पुंगावकर यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. पी.ए. प्रभू यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सहसमन्वयक सतीश काळे यांनी आभार मानले.

परिषदेस डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. एस.बी. सादळे, अतुल इंगवले, महेश साळुंखे, श्रीकांत भोसले, डॉ. एस.बी. चव्हाण, डॉ. जी.एम. सोळंकी, डॉ. श्रीपाल गायकवाड, उदय पाटील, गणेश शिंदे, आवेश हुसैनी, योगेश गांधी, विजय पाटील, रमेश पवार, श्रुजीत शिंगे यांच्यासह इशरेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेत १३० शोधनिबंधांचे सादरीकरण

या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातील संशोधकांकडून पर्यावरणविषयक १३० शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. त्यांचे पुढील दोन दिवसांत विविध सत्रांतून सादरीकरण होईल. त्यांतील निवडक शोधनिबंध ‘इंडियन जर्नल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’ या शोधपत्रिकेमधून प्रकाशित करण्यात येणार आहेत.