कतृत्वाचे आई-बाप म्हणजे शरद शिक्षण संस्था : प्रा. आप्पासाहेब खोत
यड्राव प्रतिनिधी: “कतृत्वाचे आई-बाप म्हणजे ही शिक्षण संस्था आहे. आपल्या आयुष्याची माती होवू नये म्हणून हि शरद शिक्षण समुह विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार देत आहे. जीवनामध्ये कुठे थांबयच हे ज्याला कळंल तोच यशस्वी होतो. त्यामुळे पुस्तके वाचा, चरित्रे वाचा. चरित्रांची पुस्तक वाचला तर आयुष्य चारित्र्य संपन्न होईल.” असे प्रतिपादन जेष्ठ ग्रामिण साहित्यिक प्रा. आप्पासाहेब खोत यांनी केले. ते यड्राव येथील शरद सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. यावेळी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थीत होते.
प्रा. खोत पुढे म्हणाले, ‘परमेश्वराने जन्माला घालताना आपला संसार करता करता आणखी एक जबाबदारी दिलेला असते. अनिल बागणे यांना ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित करण्यासाठीची जबाबदारी शरद शिक्षण समुहाच्या माध्यमातून दिली आहे. आपण करीत असलेले हे काम म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. आणि समाजाची सेवा करतो त्याचा संसार परमेश्वर सांभाळतो. असे सांगून त्यांनी संस्था, पालक व विद्यार्थ्यांनी काय करायचे याचा कानमंत्र दिला.’ यावेळी त्यांनी ‘महापूर’ हि कथा कथन केली.
अनिल बागणे म्हणाले, पैसे हे साध्य नाही, साधन आहे. आणि तो मिळवायचे असेल तर त्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी हि शिक्षण संस्था उभी राहिली आहे. समाजात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांनी विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे समाजात ‘शरद पॅटर्न’ अनुकरणीय होत आहे.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मनोज कुभांर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार २०२४ प्रा. नम्रता कमते यांना देवून सन्मान करण्यात आला.
दरम्यान पेपर फिशपॉन्ड, रांगोळी, मेहंदी, पाककला, यासह क्रिकेट, कब्बडी, खो-खो, अथलेटीक्स, बुध्दीबळ, कॅरम, गोळा-थाळी फेक यासह विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावळी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाय.बी. पाटील, प्रा. एस.टी. कोळी यांनी केले. आभार प्रा. मंदाकिणी निगवे यांनी मानले.