किशोरवयीन मुलांना वेळीच अचूक माहिती पुरविणे आवश्यक : डॉ. सुप्रिया देशमुख

किशोरवयीन मुलांना वेळीच अचूक माहिती पुरविणे आवश्यक : डॉ. सुप्रिया देशमुख

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुले वयात येताना योग्य मार्गदर्शन व अचूक माहिती पुरविणे अत्यंत आवश्यक असून शिक्षकांनी 'पौगांडावस्थेतील  होणारे बदल व जीवन कौशल्य' याबाबत विद्यार्थ्यांना वेळीच मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी केले. जिल्हा एड्स नियंत्रण विभाग सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूरच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या 'किशोरवयीन जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम' कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी एचआयव्ही,एड्स,क्षयरोग, गुप्तरोग याची शास्त्रीय माहिती सोबतच आरोग्यदायी पिढी निर्माण करण्यासाठी  शिक्षकांनी  मुलांची मैत्रीचे नाते निर्माण करून मोकळेपणाने संवाद साधावा असे आवाहन त्यांनी केले.

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.पल्लवी तारळकर यांनी आपल्या मनोगतात "शिक्षक म्हणजे मुलांचे 'आयडॉल' असतात. तेव्हा मोबाईलच्या आभासी जगात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते हे अधोरेखित केले.

समुपदेशक दीपक सावंत यांनी 'मानसिक आरोग्य' या विषयावर माहिती दिली.सूत्रसंचालन व स्वागत विनायक देसाई यांनी केले. आभार जयवंत सावंत यांनी मांडले.

यावेळी जयश्री पाटील, संजय गायकवाड, सागर परीट यांच्यासह भुदरगड तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.