आंबेओहोळ प्रकल्पातील शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही - मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - आंबेओहोळ प्रकल्पातील सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना देऊन या प्रकल्पातील शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली.
आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशा सूचना देऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी संकलन दुरुस्तीची सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रलंबित विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सद्यस्थितीची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, भूसंपादन अधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवाजीराव भोसले, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे व प्रसाद चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच संबंधित अधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.