शरद कृषिचे गणेशवाडीत विशेष श्रम संस्कार शिबिर संपन्न
जैनापूर प्रतिनिधी : जैनापूर येथील शरद कृषि महाविद्यालय आणि गणेशवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सात दिवस विशेष श्रमसंस्कार शिबिर गणेशवाडी येथे संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले, या शिबिराअंतर्गत विद्यार्थ्यांनी श्रमदानासोबत गावकरी व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करावेत. तसेच पाण्याचे व्यवस्थापन, शेतीचे योग्य नियोजन या बद्दल मार्गदर्शन केले. यासाठी शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्ट सर्वोतोपरी मदत करेल असे मत व्यक्त केले.
शिबिरादरम्यान संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गणेशवाडी गावास भेट देऊन शिबिरातील कामांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दररोज श्रमदान, पथनाट्य, जनजागृती, वृक्षारोपण, प्रभात फेरी असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. दररोज विविध विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डॉ. सुरज जाधव यांनी ‘जनावरांचे आहारशास्त्र’, प्रा. संतोष निळे यांनी ‘एकात्मिक रोग व्यवस्थापन’, प्रा. दिगंबर मुंडफने यांनी ‘सेंद्रीय शेती’, सौ. आशाराणी मगदूम यांनी ‘भविष्यावर बोलू काही’ तर हिमांशू लेले यांनी ‘कचरा व्यवस्थापन व हवामान बदल’ याविषयी मार्गदर्शन केले. संध्याकाळी विद्यार्थ्यांकडून गावात विविध विषयांवर पथनाट्य सादर करण्यात आले.
शिबिराची सांगता सरपंच प्रशांत अपीने यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी व गणेशवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन शरद कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. एस. एच. फलके, कार्यक्रम आधिकारी प्रा. डी. आर. मगदूम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ग्रामपंचायत गणेशवाडी यांच्यावतीने करण्यात आले होते.